
आंबेगाव तालुक्यातील कळंब गावातील कहडणे वस्तीवर लावण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये नर जातीचा दीड वर्षाचा बिबट्या जेरबंद झाला आहे. अजूनही या परिसरात तीन बिबटे फिरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून या बिबट्यामुळे शेतात काम करता येत नसल्याने पुन्हा पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
चांडोली रस्त्यावर मागील काही महिन्यापासून तीन ते चार बिबटे एकत्र फिरताना वारंवार नागरिकांना दिसत आहेत, त्याच परिसरात अनेक वेळा दुचाकी वर बिबट्याने हल्ले देखील केलेले आहेत वारंवार या परिसरात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला होता, त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले होते. या परिसरातील शेतकऱ्यांना दिवसादेखील शेतात काम करणे मुश्किल झाले होते, या रस्त्यावर दुचाकी वर हल्ला देखील करण्याच्या घटना घडल्या होत्या यामुळे शेतकऱ्यांनी वन विभागाकडे या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली होती, आज सकाळी कहडणे वस्ती येथे लावण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये दीड वर्षे वयाच्या नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला असला तरी अजूनही तीन बिबटे या परिसरात वावरत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. एक बिबट्या पकडून शेतकऱ्यांचे इथले भय संपत नाही, अजूनही या परिसरात फिरत असलेले तीन बिबटे जेरबंद होणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या परिसरात दोन बिबटे तीन बिबटे एकत्र फिरत असल्याचे अनेक व्हिडिओ मागील दोन महिन्यात सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
सदर बिबट्याला वनविभागाचे वनपाल शशिकांत मडके यांनी ताब्यात घेतले असून या बिबट्याला जुन्नर येथील माणिकडोह येथील निवारा केंद्रात सोडणार असल्याचे त्यांनी सांगितले.


























































