आज भाजप मुख्यालयावर आपच्या नेत्यांसह धडक, केजरीवाल यांचे मोदींना थेट आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वीय सहाय्यक बिभव कुमार यांच्यावर कथित मारहाणीचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आक्रमक झाले आहेत. ‘मोदीजी, तुम्ही जेल-जेलचा खेळ खेळताय. आज दुपारी 12 वाजता ‘आप’चे सर्व खासदार, आमदार, नेत्यांसह भाजप मुख्यालयावर येतोय. तुम्हाला ज्यांना तुरूंगात टाकायचं आहे त्यांना टाका’, असे थेट आव्हानच केजरीवाल यांनी दिले आहे.

आपच्या खासदार स्वाती मालिवाल यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक बिभव कुमार यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप केला. परंतु व्हायरल व्हिडिओमध्ये मालिवाल याच बिभव कुमार यांना तुझी नोकरी खाईन, अशी धमकी देताना दिसत आहेत. दिल्ली पोलिसांकडे मालिवाल आणि बिभव कुमार यांनी एकमेकांविरुद्ध तक्रार दाखल केली. मात्र, दिल्ली पोलिसांनी आज बिभव कुमार यांना अटक केली. यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी एक व्हिडिओ पोस्ट करून भाजपला इशारा दिला आहे. 2 मिनिटे 33 सेपंदाच्या या व्हिडिओत केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अटक करून दाखविण्याचे आव्हान दिले आहे.

केजरीवाल यांनी काय म्हटले?

– ‘आम आदमी पक्षाच्या मागे भाजपचे लोक का लागले आहेत? एकामागोमाग आपच्या लोकांना तुरूंगात टाकत आहेत. मनिष सिसोदिया, सत्येंद्र जैन, संजय सिंह, मला तुरूंगात टाकले. आज माझ्या पीएला टाकले. आता भाजपवाले म्हणतात की, राघव चढ्ढा, सौरभ भारद्वाज, आतिशी यांनाही तुरूंगात टाकणार.’

– ‘आमचा गुन्हा काय? आमचा गुन्हा एकच आहे की, आम्ही सरकारी शाळा चांगल्या बनवल्या. आम्ही गरिबांच्या मुलांना शिक्षण दिले. मोहल्ला क्लिनिक, सरकारी रुग्णालये बनवली. 24 तास वीजपुरवठा सुरू ठेवला. मोफत वीज दिली. भाजप हे करू शकली नाही. त्यांना या सर्व सुविधा बंद करायच्या आहेत’.

– ‘मोदीजी, तुम्ही जेल-जेलचा खेळ खेळताय. मी उद्या दुपारी 12 वाजता आपच्या सर्व मोठय़ा नेत्यांबरोबर भाजपच्या मुख्यालयात येत आहे. तुम्हाला ज्यांना तुरूंगात टाकायचे आहे त्यांना टाका. मोदीजी उद्या भाजप मुख्यालयाला भेटा’.

– ‘मोदींना वाटतेय की आपच्या नेत्यांना तुरूंगात टाकले, तर पक्ष संपेल. पण आप संपणाऱयातला नाही. आपच्या जितक्या नेत्यांना तुरूंगात टाकाल तितक्या पटीने आपचे नेते देश घडवतील’.