
एक वर्षापूर्वी रात्रीच्या अंधारात आरेच्या जंगलातील शेकडो वृक्षांची तत्कालीन सरकारने अमानुष कत्तल केली. शेकडो आदिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते त्या धारातीर्थी पडलेल्या वृक्षांना मिठ्या मारून अक्षरश: रडले होते. त्या दु:खद घटनेला आज वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त आरेतील आदिवासी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या त्या वृक्षबांधवांना श्रद्धांजली अर्पण केली.
4 ऑक्टोबर 2019मध्ये झालेली ती केवळ झाडांची कत्तल नव्हती तर मुंबईला ऑक्सिजन पुरवणाऱ्या फुफुसांवरच कुऱ्हाडी चालल्या होत्या. मेट्रो कारशेडसाठी विकासाच्या नावावर सजीव वृक्षांचे जीव घेणाऱ्या सरकारचा त्या वेळी तीव्र निषेध नोंदवला गेला होता. कत्तलीमुळे मरून पडलेल्या त्या वृक्षांची छायाचित्रे लावून आदिवासींनी रविवारी त्यासमोर दिवे लावले. त्यांना फुले अर्पण करून प्रार्थना केली. याशिवाय वृक्षारोपण करण्यात आले. तसेच मोठ्या झाडांवर ‘अहिंसा परमो धर्म’ असा संदेश देणारी चित्रे लावली गेली. लहान मुलेही या मोहिमेत सहभागी झाली होती.
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे आभार
आरेतील पर्यावरणाच्या रक्षणासाठी धाडसी निर्णय घेणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारचे या वेळी आदिवासी हक्क संवर्धन समितीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. आरे आंदोलनात अटक झालेल्या आंदोलनकत्र्यांवरील सर्व गुन्हे सरकारने मागे घेतल्याबद्दल ऋण व्यक्त करण्यात आले.





























































