
एबीजी शिपयार्ड या कंपनीने देशातील 28 बँकांना 22 हजार 842 कोटी रुपयांना चुना लावून तो पैसा परदेशात नेल्याच्या प्रकरणाने खळबळ माजली आहे. या घोटाळय़ाची चाहूल केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला पाच वर्षांपूर्वीच लागली होती, परंतु त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचे उघड झाले आहे. एबीजी शिपयार्ड ही मोदी-शहा यांच्या गुजरातमधील पंपनी असल्यानेच राजकीय हेतूने या घोटाळय़ाकडे काणाडोळा केला गेला. परिणामी देशातील नागरिकांचे हजारो कोटी रुपये परदेशात गेले अशी चर्चा सुरू झाली आहे.
काळा पैसा देशात परत आणण्याची घोषणा मोदी सरकारने केली होती; परंतु एबीजी शिपयार्डने देशाचाच पैसा परदेशात नेला. सीबीआयने गेली दीड वर्षे केलेल्या चौकशीनंतर ते उघड झाले आहे. नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या जोडीने पंजाब नॅशनल बँकेला 14 हजार कोटी रुपयांना चुना लावून परदेशात पळ काढला. एबीजी शिपयार्डने त्यांच्याही दुपटीने देशातील बँकांची फसवणूक केली आहे.
देशाची प्रमुख बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) नोव्हेंबर 2018 मध्येच सीबीआयला एबीजी शिपयार्डकडून होत असलेल्या फसवणुकीबद्दल कळवले होते आणि त्या पंपनीविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदवावा अशीही मागणी केली होती. परंतु सीबीआयने काहीच कारवाई न करता एसबीआयची ती फाइल परत पाठवली असेही उघड झाले आहे. आयसीआयसीआय बँक, आयडीबीआय बँक यांचीही एबीजी शिपयार्डकडून फसवणूक झाली आहे. फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टनुसार एप्रिल 2012 ते जुलै 2017 या कालावधीत एबीजी शिपयार्डने संबंधित बँकेकडून घेतलेला निधी बँकेने दिलेल्या कारणाव्यतिरिक्त अन्यत्र वळवला असे दिसून आले.
फसवणूक झालेल्या बँकांच्या वतीने यासंदर्भात नोव्हेंबर 2019 मध्ये सीबीआयकडे पहिली तक्रार केली होती. त्यानंतर बँका आणि सीबीआय यांच्यादरम्यान माहितीची देवाणघेवाण सुरू होती. परंतु ठोस कारवाई होत नव्हती. बँकांनी एका संयुक्त बैठकीनंतर नव्याने तक्रार करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार डिसेंबर 2020 मध्ये दुसरी तक्रार दाखल करण्यात आली.
मुंबईसह देशभरात सीबीआयची धाडसत्रे
सीबीआयकडून आता एबीजी शिपयार्डशी संबंधित कार्यालयांवर धाडसत्र सुरू आहे. मुंबईसह देशभरात ही धाडसत्रे सुरू आहेत. पंपनीच्या तत्कालीन अधिकाऱयांची सीबीआयकडून उलटतपासणी केली जात आहे. बरोबरच एकही संबंधित अधिकारी देशाबाहेर पळून जाऊ नये याचीही दखल घेतली जात आहे.
एबीजी शिपयार्ड काय करते?
एबीजी शिपयार्ड ही कंपनी मोठय़ा जहाजांची निर्मिती आणि दुरुस्तीचे काम करते. गुजरातच्या सुरत आणि दहेजमध्ये या कंपनीची मुख्यालये आहेत. सुरतमधील शिपयार्डमध्ये 18 हजार डेड वेट टनेज तर दहेजमधील शिपयार्डमध्ये 1 लाख 20 हजार डेड वेट टनेज क्षमतेची जहाजे बांधण्याची क्षमता आहे.
आणखी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
एबीजी शिपयार्ड लिमिटेडचे तत्कालिन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ऋषि अगरवाल यांच्याविरुद्ध सीबीआयने शनिवारीच गुन्हा दाखल केला. आज आणखी चार जणांविरुध्द गुन्हा नोंदवला गेला. त्यात पंपनीचे तत्कालीन कार्यकारी संचालक सनातनम मुत्तुस्वामी, संचालक अश्विनी कुमार, सुशीलकुमार अग्रवाल आणि रवी विमल नेवेतिया यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे एबीजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या पंपनीविरुद्धही गुन्हा नोंदवला गेला आहे.
z आयसीआयसीआय बँक ः 7089 कोटी रुपये
z आयडीबीआय बँक ः 3640 कोटी रुपये
z स्टेट बँक ऑफ इंडिया ः 2943 कोटी रुपये
z बँक ऑफ बरोडा ः 1602 कोटी रुपये
z पंजाब नॅशनल बँक ः 1294 कोटी रुपये
z एक्झिम बँक ऑफ इंडिया ः 1326 कोटी रुपये
z इंडियन ओव्हरसीज बँक ः 1229 कोटी रुपये
z बँक ऑफ इंडिया ः 768 कोटी रुपये
z ओरियंटल बँक ऑफ कॉमर्स ः 769 कोटी रुपये
z स्टँडर्ड चार्टर्ड बँक ः 743 कोटी रुपये
z सिंडिकेट बँक ः 440 कोटी रुपये
z स्टेट बँक ऑफ इंडिया, सिंगापूर ः
459 कोटी रुपये
z देना बँक ः 406 कोटी रुपये
z आंध्र बँक ः 266 कोटी रुपये
z सीकॉम लिमिटेड ः 259 कोटी रुपये
z आयएफसीआय लिमिटेड ः 300 कोटी
z एसबीएम बँक ः 125 कोटी
z फिनिक्स आर्ट प्रायव्हेट लिमिटेड ः 140 कोटी
z एलआयटी ः 136 कोटी
z डीसीबी बँक ः 105 कोटी
z आर्पे लॉजिस्टिक्स लिमिटेड ः 95 कोटी
z पंजाब नॅशनल बँक (इंटरनॅशनल) लिमिटेड ः 97 कोटी
z लक्ष्मी विलास बँक लिमिटेड ः 61 कोटी
z इंडियन बँक ः 17 कोटी
z इंडियन बँक, सिंगापूर ः 43 कोटी
z पॅनरा बँक ः 40 कोटी
z सेंन्ट्रल बँक ऑफ इंडिया ः 39 कोटी
z एस्सर प्रोजेक्ट्स इंडिया लिमिटेड ः 39 कोटी
z पंजाब सिंध बँक ः 36 कोटी
z एस्सर पावर (झारखंड) लिमिटेड ः 17 कोटी
z यस बँक ः 1 कोटी 71 लाख
मोदींच्या काळात 5 लाख 35 हजार कोटींचे बँक घोटाळे
‘नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून आतापर्यंत 5 लाख 35 हजार कोटी रुपयांचे बँक घोटाळे झाले. गेल्या 75 वर्षात देशातील जनतेच्या पैशांची इतकी फसवणूक कधीच झाली नव्हती.’ अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज केली. एबीजी शिपयार्ड प्रकरणावरून राहुल गांधी यांनी मोदींना लक्ष्य केले. एबीजी शिपयार्डने देशातील बँकांची 22 हजार 842 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. हा देशातील सर्वात मोठा बँक घोटाळा आहे असे राहुल गांधी म्हणाले. लूट आणि फसवेगिरीचे हे दिवस फक्त मोदी मित्रांसाठी ‘अच्छे दिन’ आहेत असे ट्विटही त्यांनी केले आहे.




























































