ठसा – अॅड. मनोहर गोमारे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अभय मिरजकर

ज्येष्ठ समाजवादी विचारसरणीचे अग्रणी अॅड. मनोहरराव एकनाथराव गोमारे यांचे वयाच्या 86 व्या वर्षी 20 डिसेंबर 2023 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने लातूरमधील एका संघर्षशील पर्वाचा अस्त झाला म्हटले तर वावगे ठरणार नाही. लातूरमधील कोणतीही चळवळ असो, आंदोलन असो, त्यामध्ये अॅड. मनोहरराव गोमारे यांचा सहभाग अग्रभागी असायचा. धाराशिव जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून एक वेळा निवडून आलेले अॅड. मनोहरराव गोमारे यांनी नंतर विधानसभा, लोकसभा निवडणुका लढवल्या; पण ते निवडून आले नाहीत. त्यांच्या निधनाने लातूरच्या चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. लातूर तालुक्यातील बोरी येथे 1938 मध्ये त्यांचा जन्म झाला. केवळ सहा महिन्यांत त्यांना मातृसुखापासून कंचित राहावे लागले. मोठय़ा भावाची पत्नी आणि आजी (आईची आई) यांनी त्यांचा सांभाळ केला. उर्दू भाषेतील सरकारी शाळेत त्यांनी चौथीपर्यंतचे शिक्षण घेतले. मारवाडी राजस्थान शाळेतून दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. 1956 मध्ये मॅट्रिक झाल्यावर त्यांनी हैदराबाद येथे उस्मानियाँ विद्यापीठातून कला शाखेची पदवी प्राप्त केली. छत्रपती संभाजीनगर येथील माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयातून नोकरी करत शिक्षण घेतले. 1962 मध्ये एल.एल.बी. उत्तीर्ण झाल्यानंतर 1963 पासून लातूर येथे वकिली व्यवसायास सुरुवात केली. अॅड. हरिश्चंद्र पाटील यांच्या कार्यालयात पाच वर्षे सहायक म्हणून काम केले. 1967 मध्ये समाजवादी पार्टीचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. बापूसाहेब काळदाते यांच्या प्रचारासाठी जिवाचे रान केले आणि ते विजयी झाले. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत कासारखेडा मतदारसंघातून ते निवडून आले आणि 1972 पर्यंत सदस्य म्हणून काम केले. एस.एम. जोशी, नानासाहेब गोरे, मधू दंडवते, मधू लिमये, जॉर्ज फर्नांडिस, बाबा आढाव, भाई वैद्य, मृणाल गोरे, ग. प्र. प्रधान, सदानंद वर्दे, पन्नालाल सुराणा, बापूसाहेब काळदाते आदी मान्यवरांचा सहवास त्यांना लाभला. अंधजन विकास मंडळ, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, शासकीय बालसुधारगृह सदस्य, बाबासाहेब परांजपे प्रतिष्ठान, टीचर्स एज्युकेशन सोसायटी, नागरी हक्क संरक्षण समिती, अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये ते सक्रिय होते. लातूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. वकील मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. 1972 मध्ये लातूर येथे झालेल्या एस.टी. विभागीय कार्यालयासाठी झालेल्या आंदोलनात ते सक्रिय सहभागी होते. यामध्ये ते कारागृहात गेले. पोलिसांनी केलेल्या लाठीमारात जखमी झाले. 1975 च्या आणीबाणीच्या वेळी तुरुंगवास भोगला. नाशिव येथील कारागृहात त्यांना ठेवण्यात आले होते. पाणीपुरवठा खासगीकरणाविरोधातही त्यांना नाशिक कारागृहात पाठविण्यात आले होते. 1978 मध्ये शिवराज पाटील चाकूरकर यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवली आणि सव्वातीन हजार मतांनी पराभव पत्करावा लागला. 1980, 1984, 1989, 2004, विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. 1991 च्या लोकसभा निवडणुकीतही ते पराभूत झाले. 1996 ची निवडणूकही ते हरले. मात्र, पराभवाने कधीच खचले नाहीत. ध्येयवादी राजकारणाचा प्रचंड अनुभव असतानाही जातीयवादी राजकारणाने त्यांचा बळी घेतला, हे सर्व लातूरकर जाहीरपणे सांगतात. संघर्ष आणि मनोहरराव गोमारे असे एक नातेच लातूरकरांनी अनुभवले आहे. एक तत्त्वनिष्ठ राजकारणी, सामाजिक कामात सदैव तत्पर असणारे व्यक्तिमत्त्व, लातूरच्या चळवळीचे अग्रणी अशीच अॅड. मनोहरराव गोमारे यांची ओळख होती.