
>> सीए अभिजित कुळकर्णी – योगशिक्षक, भारतीय योग मंदिर
‘कपालभाती’ हा शब्दसुद्धा अतिशय सुंदर आहे. यामध्ये दोन विभिन्न शब्दांचा संधी झालेला आहे. पहिला शब्द म्हणजे ‘कपाल’ आणि दुसरा म्हणजे ‘भाती’.
‘कपाल’ या शब्दाचा प्रचलित अर्थ आहे भाल किंवा ललाट. ‘कपाल’ या शब्दाचा खरा अर्थ आहे, माणसाच्या शरीरातील हाडांचा सापळा किंवा कवटी, पण योगशास्त्रीय परिभाषेत ‘कपाळ’ या शब्दाचा अर्थ आहे श्वसनमार्ग. अर्थात नासिका, श्वासनलिका, हृदय, फुप्फुस आणि वायुकोष. त्याद्वारे शरीरामध्ये प्राणवायू पोहोचविला जातो.
‘भा’ म्हणजे प्रकाश, ‘भाती’ म्हणजे प्रकाशित होणे, चमकणे, स्वच्छ होणे. ‘कपालभाती’ या शब्दाचा म्हणूनच अर्थ होतो की, जी क्रिया केल्याने आपला श्वसनमार्ग आपली फुप्फुसे स्वच्छ होतात.
अष्टांगयोगातील दुसरे अंग आहे नियम. या नियमाची पाच उपांगे आहेत. शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. यातील सर्वात पहिले उपांग म्हणजे शौच अर्थात स्वच्छता. शरीराची अंतर्बाह्य शुद्धी आणि मनाचीसुद्धा स्वच्छता यामध्ये निहित आहे. शारीरिक शुद्धीसाठी आपण अनेक क्रिया करतो. उदाहरणार्थ रोज सकाळी उठल्यानंतर दंतधावन, स्नान करणे, शौचाला जाणे इत्यादी. तथापि केवळ या क्रिया केल्यामुळे शरीर पूर्णतः शुद्ध होत नाही.
शरीरशुद्धीसाठी अनेक क्रिया आयुर्वेदामध्ये आणि योगाभ्यासामध्ये सांगितलेल्या आहेत. आयुर्वेदामध्ये सांगितलेली पंचकर्मचिकित्सा ही मुख्यत्वे शरीरातील विषारी/अतिरिक्त द्रव्ये यांचा निचरा होण्यासाठी आहेत.
तसेच योगाभ्यासामध्ये षट्कर्मे सांगितलेली आहेत. ही षट्कर्मे म्हणजे ‘कपालभाती’, ‘नेती’, ‘त्राटक’, ‘नौली’, ‘धौती’, ‘बस्ती.’
या सहा क्रियांपैकी सर्वात सहज, सुलभ आणि सोपी क्रिया म्हणजे ‘कपालभाती.’ या क्रियेमध्ये केवळ हवेचा आधार घेऊन शरीरशुद्धी केली जाते.
क्रिया कशी कराल…
श्वासोच्छ्वासाची क्रिया ही दोन प्रकारे होते. एक सहजपणे आणि दुसरी स्वयंप्रेरणेने.
कपालभाती या क्रियेत उच्छ्वासाची अर्थात श्वास बाहेर फेकण्याची क्रिया ही स्वयंप्रेरणेने आणि वेगाने केली जाते.
कपालभाती शक्यतो उपाशीपोटी करावी आणि म्हणूनच सकाळची वेळ या क्रियेसाठी उपयुक्त मानली जाते.
पाठीचा कणा ताठ ठेवून सरळ बसावे. स्वस्तिकासन अथवा पद्मासनात बसावे. हातांनी गुडघे पकडून ठेवावेत. पोटाचे स्नायू थोडे ढिले ठेवावेत.
यानंतर डोळे बंद करून उच्छ्वासाची, श्वास बाहेर सोडण्याची क्रिया ही वेगाने करावी. पोटाला आत धक्का देऊन श्वास बाहेर फेकावा. साधारणपणे एका मिनिटामध्ये 120 वेळा कपालभाती झाली पाहिजे. सुरुवातीला केवळ 30 ते 40 वेळा कपालभाती आपण करू शकतो. त्यानंतर थोडे दीर्घ श्वसन करावे, अनुलोम विलोम करावा आणि पुन्हा कपालभातीचा अभ्यास सुरू करावा. साधारण पाच मिनिटांचा कपालभातीचा अभ्यास हा सामान्य माणसाला पुरेसा आहे.
कपालभातीचे लाभ कोणते…
कपालभाती केल्याने मुख्यत्वे आपल्या शरीरातील कफदोष दूर होतो. अर्थात ही क्रिया कफ विकारांवरती अतिशय लाभदायी ठरते. याने अर्धशिशी, अस्थमा, ब्रोंकायटिस यांसारखे रोग 97 टक्क्यांपर्यंत बरे होतात.
कपालभातीचा अभ्यास केल्याने आपली फुप्फुसे आणि श्वसनमार्ग श्वासनलिका नासिका आणि स्वच्छ होतात. फुप्फुसांमधील वायुकोश स्वच्छ होतात. हे वायुकोश हवेतील प्राणवायू रक्तामध्ये शोषून घेण्याचे कार्य करतात. वायुकोश शुद्ध झाल्याने आपल्या शरीरामधील प्राणवायूचे आणि शरीरामधील आणि रक्तामधील प्राणवायूचे प्रमाण वाढते. प्राणवायूचे प्रमाण वाढल्यामुळे रक्तशुद्धी होते. प्राणवायू हे एक शक्तीचे स्वरूप असल्याने ऊर्जेचे स्वरूप असल्याने आपल्याला कपालभाती केल्यानंतर फार उत्साही वाटते. केवळ शरीरच नव्हे, तर मनसुद्धा उत्साही होते आणि प्रसन्न होते. म्हणूनच कपालभाती क्रियेचा अभ्यास हा रोज झालाच पाहिजे.
उच्च रक्तदाब, हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी कपालभाती क्रिया सावकाश करावी. पाच मिनिटांपेक्षा अधिक वेळ करू नये.
भस्त्रवलोहकारस्य रेचपूरौ ससंभ्रमौ कपालभातीर्विख्याता कफदोषाविशोशिणी I





























































