
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
प्रसिद्ध नाटय़लेखक अभिराम भडकमकर, नाटय़ दिग्दर्शक सुनील शानबाग, लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे, ज्येष्ठ नृत्यांगना संध्या पुरेचा आणि तबलावादक योगेश सामसी या महाराष्ट्रातील कलाकारांना वर्ष २०१७ चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे तर सावनी शेंडे आणि आदित्य खांडवे यांची उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
कला क्षेत्रात सर्वोच्च समजल्या जाणाऱया संगीत नाटक पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली. अकादमीच्या इंफाळ (मणिपूर) येथे झालेल्या बैठकीत वर्ष २०१७ च्या नाटय़ अकादमी पुरस्कारासाठी देशभरातील ४२ कलाकारांची तर उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कारासाठी ३४ कलाकारांची निवड करण्यात आल्याचे संगीत नाटक अकादमीच्या अधिकृत ट्विटर हँडलहून सांगण्यात आले आहे. संगीत, नृत्य, नाटय़ आणि लोककला क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणाऱया कलाकारांचा संगीत नाटक अकादमीतर्फे गौरव केला जातो. या वर्षी २०१७ च्या नाटय़ अकादमी पुरस्कारासाठी संगीत, नृत्य, नाटय़ आणि लोककला या श्रेणींमध्ये देशभरातील ४२ कलाकारांची निवड करण्यात आली आहे.
गायिका सावनी शेंडे व आदित्य खांडवे यांना देण्यात येणाऱया पुरस्काराचे २५ हजार रुपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे स्वरूप आहे.
डॉ. संध्या पुरेचा यांना अकादमीची फेलोशिप
नृत्य क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. संध्या पुरेचा यांना या वर्षी संगीत नाटक अकादमीची मानाची फेलोशिप जाहीर झाली आहे. तीन लाख रुपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.



























































