नऊ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला विमानतळावर अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

सामना ऑनलाईन । मुंबई

नऊ वर्षांपासून फरार असलेल्याला बुधवारी सहार पोलिसांनी अटक केली. नवीनकुमार हरिपा पुजारी असे त्याचे नाव आहे. त्याला पुढील चौकशीकरिता मंगलोर पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे. नवीनकुमार हा मूळचा मंगलोरचा रहिवासी आहे. नऊ वर्षांपूर्वी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होताच कावूर पोलीस त्याचा शोध घेत होते, मात्र तो सापडत नव्हता. त्याच्या विरोधात मंगलोर पोलिसांनी लूक आऊट नोटीस काढली होती.

बुधवारी नवीनकुमार हा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. त्याच्या विरोधात लूक आऊट नोटीस असल्याचे विमानतळ अधिकाऱ्याच्या निदर्शनास आले. त्यांनी नवीनकुमारला ताब्यात घेऊन पुढील चौकशीकरिता सहार पोलिसांच्या ताब्यात दिले. नवीनकुमार हा अबुधाबीला जाणार होता. त्याच्या अटकेची माहिती मंगलोर पोलिसांना सहार पोलिसांनी कळवली. येत्या दोन दिवसांत मंगलोर पोलीस मुंबईमध्ये येऊन नवीनकुमारचा ताबा घेणार आहेत.