
भरधाव मोटारीवरील ताबा सुटून मोटार रस्ता दुभाजक ओलांडून विरूद्ध दिशेने येणाऱया कंटेनरखाली घुसल्याने झालेल्या भीषण अपघातात मीरा रोड येथील तिलोक कुटुंबातील चौघांसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर कार्ल्याजवळील शिलाटणे येथे सकाळी साडेसातच्या सुमारास घडली.
महावीरराज किसनराज तिलोक, शालिनी रूपनारायण तिलोक, सीमा किसनराज तिलोक, मच्छीदेवी नाथुराम तिलोक (सर्व रा. मीरा रोड, मूळ – जयपूर, राजस्थान) या एकाच कुटुंबातील चौघांसह रिहान रिझवान अन्सारी (रा. कुर्ला) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तिलोक कुटुंबीय मोटारीतून निपाणी येथे निघाले होते. सकाळी साडेसातच्या सुमारास मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात असताना कार्ला फाटय़ापुढे भरधाव मोटारीवरील चालकाचा ताबा सुटला. त्यानंतर दुभाजक ओलांडून मोटार विरुद्ध बाजूने येणाऱया कंटेनरला धडकली. अपघात एवढा भीषण होता की मोटार अक्षरशः कंटेनरखाली घुसली. यामध्ये मोटारीचा चक्काचूर झाला. तिलोक परिवारातील चौघांसह रिहान अन्सारी यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती समजताच आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, स्थानिक ग्रामस्थ, पोलीस यंत्रणा यांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनरखाली अडकलेली मोटार व प्रवाशांना बाहेर काढले. या घटनेमुळे मुंबईकडे जाणाऱया मार्गिकेवर काही वेळ प्रचंड वाहतूककोंडी झाली.




























































