
नातेवाईकाच्या घरी गेला असताना तेथील अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या मुंबई पोलीस दलातील पोलिसाला सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. आरोपी हा माजी सैनिक असून त्याला ‘पोक्सो’च्या गुह्यात नाहक गोवण्यात आले आहे, असा युक्तिवाद बचाव पक्षाने न्यायालयात केला. आरोपी धनराज बागुल याच्याविरुद्ध धारावी पोलीस ठाण्यात भादंवि कलम आणि ‘पोक्सो’ कायद्याच्या कलमांन्वये गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात अटक केली जाण्याच्या वतीने बागुलने अॅड. प्रकाश साळसिंगीकर यांच्यामार्फत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. आरोपीने नात्यातील अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध होते. तथापि, आरोपांचे स्वरूप लक्षात घेता तपासासाठी त्याच्या कोठडीची गरज नाही, असे मत नोंदवत सत्र न्यायाधीश जयश्री पुलाटे यांनी आरोपी पोलिसाला अटकपूर्व जामीन मंजूर केला.





















































