
हाथरस येथील सामूहिक बलात्कार आणि हत्याकांडामुळे अवघा देश संतप्त असतानाच पुन्हा उत्तर प्रदेशात भयंकर घटना घडली आहे. गोंडा जिह्यातील एका गावामध्ये दलित समाजाच्या तीन अल्पवयीन बहिणींवर ऑसिड हल्ला करण्यात आला. त्या तिघी झोपेत असताना ही घटना घडली. या तिघी बहिणी गंभीर जखमी झाल्या असून सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मोठी मुलगी 17 वर्षांची आहे. तिला 30 टक्क्यांवर जखमा झाल्या आहेत. तिच्या दोघी बहिणी 12 आणि 7 वर्षांच्या आहेत.
हल्लेखोर गच्चीवरून घरात घुसले
- गोंडाचे जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेशकुमार पांडे यांनी सांगितले की, तिघी बहिणी एका रूममध्ये झोपल्या होत्या. हल्लेखोर मध्यरात्री दोनच्या सुमारास गच्चीवरून घरात घुसले आणि तिघींवर ऑसिड फेकले.
- ऑसिड अॅटॅकनंतर मुलींना प्रचंड वेदना होत होत्या. त्यांची आरडाओरड ऐकल्यानंतर वडील त्यांच्या खोलीत पोहचले.
- पहाटे माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. वडिलांनी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. फॉरेन्सिक टीमसह श्वान पथकही घटनास्थळी पोहचले. पोलिसांचा तपास सुरू आहे.
- मोठ्या मुलीला गंभीर जखमा झाल्या आहे. ती बारावी उत्तीर्ण आहे. तिचे लग्न नुकतेच ठरले होते.
दलित ज्येष्ठ नागरिकाला बेदम मारहाण; मूत्र पिण्यास भाग पाडले
उत्तर प्रदेशात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत. ललितपूर येथे 65 वर्षीय दलित ज्येष्ठ नागरिकास गावातील सोनू यादव आणि काही लोकांनी जातीवाचक शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. एका कपात मूत्र भरून दिले आणि बळजबरीने त्यांच्या तोंडात ओतले. या भयंकर घटनेनंतर पोलिसांनी आरोपी सोनू यादवला अटक केली आहे.
कोरोना योद्धा नर्सला पेटवले
कोरोना योद्धा असलेल्या नर्सला रस्त्यात अंगावर पेट्रोल टाकून जाळले. यात नर्सचा मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशात विजयवाडा येथे एकतर्फी प्रेमातून माथेफिरू तरुणाने हे हत्याकांड केले.






























































