टोळीच्या वर्चस्वासाठी तरूणाच्या खूनाच्या प्रयत्न करणाऱ्या शेख टोळीवर मोक्का

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टोळीचे परिसरात वर्चस्व निर्माण करण्याच्या हेतूने किरकोळ वादातून तरूणावर कोयत्याने वार करून खूनाचा प्रयत्न करणाऱ्या शेख टोळीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्कानुसार कारवाई केली आहे. त्यांनी आतापर्यंत 20 टोळ्यांविरूद्ध कारवाई केली आहे. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

अस्लम पोपट शेख (वय 23, रा. देवाची उरळी), स्वप्नील उर्फ ऋषभ महेंद्र हिवाळे (वय 24, काळेपडळ, हडपसर), शुभम हरिवंश तिवारी (वय 19, रा. ससाणेनगर, हडपसर), अनिकेत राजू वायदंडे (वय 22, रा. काळेपडळ, हडपसर), ओंकार गोरख वाघमारे (वय 20, काळेपडळ, हडपसर), आमिर उर्फ तिवारी अस्मद शेख (वय 23, वानवडी), सौरभ लिंबराज घोडके (वय 19, उरूळी देवाची,) अर्शद शरीफ पटेल (वय 19, उरूळी देवाची), अविनाश उर्फ अवि भाऊराव पाटील (वय 23, रा. हडपसर) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या तीन साथीदारांचा शोध सुरू आहे.

टोळीप्रमुख अस्लम शेख आणि त्याच्या टोळीविरूद्ध शहरातील विविध पोलीस ठाण्यातंर्गत गुन्हे दाखल आहेत. त्यांनी टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी सातत्याने गुन्हेगारी कृत्ये सुरूच ठेवल्याचे दिसून आले आहे. दहशत माजविण्यासाठी टोळीने 13 फेब्रुवारीला गाडी पार्क करण्याच्या वादातून राहूल घडई (वय 23) तरूणावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे आणि उपायुक्त नम्रता पाटील यांच्याकडे पाठविला होता. त्यानुसार त्यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक गोरख दरेकर, प्रवीण शिंदे, अमोल घावटे, विजय कराड, प्रशांत नरसाळे यांच्या पथकाने केली.