
जिल्हा पोलीसप्रमुख राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली ‘टू-प्लस’ मोहिमेंतर्गत शिर्डी उपविभागीय कार्यक्षेत्रातील गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आले. गुन्हे करून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना वेळ पडल्यास हद्दपारही करण्यात येईल, असा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी दिला आहे.
शिर्डी उपविभागीय कार्यक्षेत्रात गुन्हेगारी रोखण्यासाठी गुन्हेगारांची अद्ययावत माहिती गोळा केली जात असून, संशयित गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची माहिती जमा करून त्यांच्या सहवासात असणारे व त्यांना पाठबळ देणाऱ्या व्यक्तींवरदेखील लक्ष ठेवण्यात येत आहे. शिर्डी उपविभागीय कार्यक्षेत्रात गुन्हेगारी, पाकीटमारी, मोबाईल चोरी, दुचाकीचोरी रोखण्यासाठीही पोलिसांचे काम सुरू असून, त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील म्हणाले, शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत ‘टू-प्लस’मधील 78 गुन्हेगार असून, त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र भरून घेत आहे. यातील गुन्हेगार पुन्हा गंभीर गुन्हा करणार नाही, यासाठी त्यांचे समुपदेशन केले जात आहे. संशियत गुन्हेगारांच्यात सुधारणा झाली नाही तर अतिशय कठोर भूमिका पोलिसांच्या वतीने घेतल्या जात आहेत. नागरिकांना गुन्हेगारांची माहिती असेल तर ती पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्या नागरिकांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील. त्याबरोबरच जनता व पोलीस सुसंवाद वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, असेही ते म्हणाले.




























































