
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
‘नेटफ्लिक्स’ या वेब चॅनेलवरील ‘सेक्रेड गेम्स’ या मालिकेतील संवादांबद्दल अभिनेत्याला जबाबदार धरता येणार नाही, असे मत दिल्ली उच्च न्यायालयाने आज व्यक्त केले. ‘सेक्रेड गेम्स’ या मालिकेतील काही भाग दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा अवमान करणारा आहे, असा आक्षेप घेत वादग्रस्त भाग वगळण्याच्या मागणीसाठी कोलकाताचे काँग्रेस कार्यकर्ते राजीव सिन्हा यांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. ‘सेक्रेड गेम्स’ या मालिकेतील राजीव गांधी यांच्या अवमानाला त्या मालिकेचे निर्माते आणि अभिनेते नवाझुद्दीन सिद्दिकी हे दोघेही जबाबदार आहेत, असा आरोप सिन्हा यांनी याचिकेत केला होता. ‘नेटफ्लिक्स’वरील ‘सेक्रेड गेम्स’ या मालिकेचे सर्वच म्हणजे आठही भाग प्रसारित झाले आहेत. आता नवे काही दाखवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

























































