
>> मृणाल चेंबूरकर
‘खाणं’ या शब्दाची तुझ्या दृष्टीने व्याख्या काय? – भूक लागली की खाणं हवंच आणि मलाही खायला आवडतं. खावंसं वाटतंय म्हणून खाणं या ‘खाणं’ या शब्दाच्या दोन व्याख्या.
खायला काय आवडतं? – मी पूर्णतः शाकाहारी आहे. मांसाहार करतच नाही. फार गोड आवडत नाही. मसालेभात, गोड वरणभात, तूप मला प्रचंड आवडतं. त्यानंतर मऊ भातावर गोड वरण आणि तूप ही माझ्यासाठी पर्वणी आहे. इतर शाकाहारातलं पावभाजी आवडते.
खाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेतेस? – फिटनेसची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे बटर वगैरे पदार्थांपासून लांब राहाते. आमचाच दिनक्रम धावपळीचा आहे असे नाही तर आज प्रत्येकालाच आरोग्यदृष्ट्या सजग राहण्याची गरज आहे. कारण खूप कष्ट करायचे आणि दुखणी मागे लावून घ्यायची हे योग्य नाही. त्यामुळे खाण्यावर नियंत्रण ठेवा आणि मजा उपभोगा असे वाटते.
आठवड्यातून किती वेळा बाहेर खातेस? – एकदा-दोनदा होतच होतं बाहेर खाणं. किंवा कंटाळा आलाय म्हणून बाहेरून मागवलं जातं.
कोणत्या हॉटेलमध्ये जायला आवडतं? – व्हेजच खात असल्यामुळे कुठल्याही हॉटेलमध्ये गेले तरी शाकाहारी पदार्थच खाते. दादरच्या ‘ग्रेट पंजाब’मध्ये जायला आवडतं.
कोणतं पेय आवडतं? – पीयूष आवडते.
प्रयोगानिमित्त बाहेर असतेस तेव्हा खाणं-पिणं कसं सांभाळतेस? – तेव्हा प्रॉडक्शनमधून खूप काळजी घेतली जाते. प्रयोगाच्या वेळी जेवणाची सोय व्यवस्थित केलेली असते. सलग 2 प्रयोग असतील तर एका प्रयोगानंतर जेवण असते. त्यामुळे आबाळ होत नाही की आता काय करायचं, कुठे जायचं हा प्रकार हल्ली होत नाही.
नाटकाच्या दौर्यानिमित्त आवडलेला पदार्थ? – काळ्या वाटाण्याची उसळ मी घरी करते. पण कोल्हापूरला खाल्लेली काळ्या वाटाण्याची उसळ मी कधीही विसरू शकत नाही. ती फारच सुंदर होती. मला स्वतःलाही करता येत नाही. असंच एकदा शेवेच्या भाजीच्याय बाबतीत झालं होतं. जळगावला जाताना एका ठिकाणी शेवेची भाजी एक माणूस करत होता. ते मी फार मन लावून बघत होते. ती भाजी खाल्ल्यानंतर मला आहाहा असं वाटलं होतं. या दोन भाज्या मला नेहमी आठवतात.
स्ट्रीट फूड आवडतं का? – हो. पण त्यामध्ये चाट आवडत नाही. किंग्ज सर्कलला पावभाजीचं स्पेशल दुकान आहे. माटुंग्याला डोसा छान मिळतो. घाटकोपरला खाऊगल्लीतली फ्रँकी आवडते.
घरातल्या स्वयंपाकात काय खायला आवडतं? – फोडणी घालून केलेला दहीभात फार आवडतो. हा दहीभात माझ्यासाठी पर्वणी आहे. शिवाय खाण्याच्या पदार्थांत माझी आवडनिवड नाही. त्यामुळे घरात मला सोपं जातं.
जेव्हा पाहुणे घरी येतात तेव्हा आवर्जून काय खाऊ घालतेस? – त्यांची मांसाहाराची मागणी असेल तर बाईकडून करवून घेते. पण शाकाहारात वेगळं काहीतरी बनवण्याचा प्रयत्न असतो. मग त्यात वरणभात, कोशिंबीर, गोड, बटाट्याची भाजी हे तर नेहमीचं असतं. पनीरचं काही वेगळं करता येईल का हे बघते.
उपवास करता का? – हरतालिका आणि वटपौर्णिमा करते.
वैविध्यपूर्ण शाकाहार दही-ताक साबुदाणा
रात्री साबुदाणे भिजत घालायचे. दुसर्या दिवशी सकाळी त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, भरपूर शेंगदाण्याचा कूट, घट्ट दही, थोडे ताक, चिमूटभर साखर, मीठ-लिंबू असे सर्व पदार्थ एकाचवेळी घालावे आणि खूप घोटायचे. दही आंबट असेल तर थोडे दूधही घालू शकता. त्यामुळे सैलपणा येतो. अप्रतिम चवीचा हा पदार्थ आहे.



























































