
सामना प्रतिनिधी, ठाणे
ग्राहकांना अचानक भरमसाट वीज बिले देऊन त्यांचे कंबरडे मोडणाऱ्या अदानीचा आणखी एक भयंकर कारनामा समोर आला आहे. मराठीद्वेष्ट्या ‘अडाणी’ने भाईंदरमध्ये लाखो ग्राहकांना गुजरातीमधून वीज बिले दिली आहेत. ही बिले पाहून भाईंदरकरांना प्रचंड धक्का बसला असून ‘अडाणी’चे डोके फिरले आहे काय? हा महाराष्ट्र आहे की गुजरात, असा संतप्त सवाल केला जात आहे.
रिलायन्सकडून दोन महिन्यांपूर्वी वीज कंपनी विकत घेणाऱ्या अदानीने आता खायचे दात दाखवण्यास सुरुवात केली आहे. वीज कंपनी विकत घेतल्यानंतर दुसऱ्याच महिन्यात अदानीने भाईंदरमध्ये चक्क गुजरातीमधून बिले दिली आहेत. भाईंदर शहर, उत्तन, राईगाव, मोरवा, मॅक्सेस मॉल परिसर, साठ फूट रोड, पूर्वेला भाईंदर स्टेशन परिसर, गोडदेव या परिसरांतील नागरिकांच्या हाती ही गुजरातीतील वीज बिले पडताच त्यांचा संतापाचा भडका उडाला आहे. अनेकांनी ही वीज बिले आम्ही स्वीकारणार नाही, असे अदानीच्या कर्मचाऱयांना ठणकावून सांगितले.
कार्यालयात घुसू, काळे फासू; शिवसेनेचा इशारा
अदानीच्या अधिकाऱ्यांनी हा ‘अडाणी’पणा केला आहे की जाणूनबुजून मराठीवर घाला घातला आहे याचे उत्तर त्यांनी द्यावे. भाईंदरमध्ये गुजराती वीज बिले देण्याचा संबंध काय? हा गुजरात नाही महाराष्ट्र आहे लक्षात ठेवा. असे ठणकावतानाच ही वीज बिले मागे घ्या, पुन्हा अशी मुजोरी करू नका. अन्यथा गाठ शिवसेनेशी आहे. कार्यालयात घुसू आणि काळे फासू आणि जोपर्यंत बिले मराठीतून येत नाहीत तोपर्यंत दणका देत राहू, असा इशारा भाईंदर शिवसेना जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे यांनी दिला.



























































