महाविकास आघाडीकडून जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम सुरू, आदिती तटकरे यांचे प्रतिपादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात महाआघाडी सरकार सत्तारूढ होईल, असे कुणालाही वाटले नव्हते. मात्र, शरद पवार, उद्धव ठाकरे व सोनिया गांधी यांच्या एकत्रित प्रयत्नाने महाराष्ट्रात सरकार स्थापन झाले. आता राज्यातील जनतेचे जास्तीत जास्त प्रश्न सोडविण्याचे काम महाविकास आघाडी सरकारकडून सुरू असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी केले.

महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानअंतर्गत राहुरी शहरातील 26 कोटी रुपये खर्चाच्या सुधारित पाणीपुरवठा योजना कामाचे भूमिपूजन राज्यमंत्री आदिती तटकरे, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी तटकरे बोलत होत्या. यावेळी आमदार लहु कानडे, माजी नगराध्यक्षा उषा तनपुरे, नगराध्यक्ष अनिल कासार, जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, ज्ञानदेव वाफारे, मुख्याधिकारी सचिन बांगर, मुख्याधिकारी श्रीनिवास कुऱहे, राहुरी नगरपरिषदेचे नगरसेवक व शहरातील नागरिक उपस्थित होते.

राज्यमंत्री तटकरे म्हणाल्या, राज्याला नेतृत्व देणारा जिल्हा अशी नगरची ओळख आहे. पाणी योजनेसाठी इतर मतदारसंघांच्या तुलनेत राहुरीला झुकते माप मिळाल्याचेही त्या म्हणाल्या.

राज्यमंत्री डॉ. कदम म्हणाले, राज्याच्या राजकीय पटलावर जुन्यांची प्रेरणा व नव्यांची सांगड घालून प्रश्न सोडविण्याचे काम महाविकास आघाडी सरकारकडून केले जात आहे. तरुण पिढीला प्रोत्साहन देणे हे सरकारचे धोरण असल्याने राज्याच्या मंत्रिमंडळात तरुणांना काम करण्याची मिळालेली संधी हे नव्या नेतृत्वाचे भाग्य आहे.

राज्यमंत्री तनपुरे म्हणाले, शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी नगरविकास खात्याकडे पाठपुरावा केल्याने 2020 मध्ये पाणी योजनेला मंजुरी मिळाली. विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुरीतील सुधारित पाणी योजना मंजुरीचा कागद दाखविला होता. मात्र, प्रत्यक्षात महाविकास आघाडी सरकारच्या काळात 28 एप्रिल 2020 रोजी प्रशासकीय मान्यता मिळून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केल्याने 26 कोटी रुपये खर्चाच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न मार्गी लागला. त्यामुळे भाजप सरकारच्या काळातील तत्त्वतः मान्यतांवर राहुरीकरांचा विश्वास राहिलेला नाही.

पंतप्रधान आवास योजनेत राज्य सरकारने पैसे दिले. मात्र, केंद्राकडून पुरेसे पैसे मिळालेच नाहीत. राज्यातील घरकुल योजना साकार करण्यासाठी 10 हजार कोटी रुपये अपेक्षित असताना अवघे 800 कोटी रुपये राज्याला मिळाल्याने पंतप्रधान आवास योजनेची अवस्था बिकट झाली आहे. असेही ते म्हणाले.

जातीपातीच्या राजकारणात भाजप माहिर – रोहित पवार

आमदार रोहित पवार म्हणाले, निवडणुका संपल्यावर पक्षीय राजकारण विसरायचे असते. मात्र, जनतेचे देणे-घेणे नसलेल्या भाजपच्या मंडळींना कुठल्याही गोष्टीत राजकारण करण्याची सवय लागली आहे. कोरोनाच्या संकटात घरात बसून राहिलेली भाजपची मंडळी जनआशीर्वाद यात्रेच्या नावाखाली महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्यासाठी बाहेर पडली आहे. जामखेड मतदारसंघात माजी मंत्र्याने श्रीफळ वाढविले. मात्र, विकासाचे कुठलेही काम मार्गी लागले नाही. मध्यंतरी मराठा ओबीसी आरक्षणाचे राजकारण भाजपाने सुरू केले. मराठा आरक्षणाचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे; पण निवडणुका जवळ आल्याने भाजपाचे लोक राजकारण करीत आहेत. जातीपातीच्या राजकारणात भाजप माहिर असल्याचेही ते म्हणाले.