
रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे येथील आदित्य श्रीरंग भट याने जागतिक फोटोग्राफी स्पर्धेमध्ये मॅक्रो गटामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला. डॅमसेलप्लाय कीटक पाने कुरतडतानाचा फोटो आदित्यने काढला होता. जगभरातून आलेल्या 2 लाख 60 हजार छायाचित्रातून आदित्य भटने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
आदित्य याला लॉकडाऊनमध्ये मोबाईलद्वारे फोटो काढण्याचा छंद लागला. त्यातून अनेक चांगले चांगले फोटो परिसरातील जंगलभागात जाऊन काढले होते. त्यानंतर महाविद्यालयीन जीवनात वडिलांना हॉटेल व्यवसायात मदत करीत असताना मोकळ्या वेळात फोटोग्राफीचा छंद त्याने जोपासला. अनेक फोटोग्राफीच्या स्पर्धांमध्ये त्याने भाग घेतला होता. जागतिक रेकाॅर्ड स्पर्धेत एका मिनिटात 163 फोटो काढून प्रथम क्रमांक मिळवला होता. शाओमीने आयोजित केलेल्या जागतिक मोबाईल फोटोग्राफी स्पर्धेत त्याने काढलेल्या फोटोला प्रथम क्रमांक मिळाला. या स्पर्धेमध्ये 191 देशांमधून दोन लाख साठ हजार फोटो आले होते.