मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या उद्घाटनाची तारीख हुकली, आदित्य ठाकरे यांची खोके सरकारवर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईमधील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेला ‘मुंबई ट्रान्स हार्बर लिंक’ प्रकल्पाचे उद्घाटन 25 डिसेंबर 2023 ला होईल असे सांगितले जात होते; मात्र उद्घाटनाची ही तारीखही आता हुकली आहे. यावरून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी, ‘महाराष्ट्राला पुन्हा एकदा फसवले’ अशा शब्दांत खोके सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

जनहिताची कामे पूर्ण झाल्यावरही केवळ निवडणुका डोळय़ासमोर ठेवून विविध प्रकल्प उद्घाटनाअभावी रखडवून ठेवले जात आहेत. याकडे आदित्य ठाकरे सातत्याने सरकारचे लक्ष वेधून पूर्ण झालेले प्रकल्प तातडीने सुरू करण्याची मागणी करत आहेत. आज ‘मुंबई ट्रान्स हार्बर लिंक’च्या उद्घाटनाची तारीख असेल असे मीडियात सांगितले होते; पण आता ते उद्घाटन पुन्हा पुढच्या वर्षावर ढकलले, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

कोणासाठी नेमपं थांबवलं आहे हे सगळं?
3 महिने तयार असूनही मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे उद्घाटन नाही. 8 महिने तयार असूनही दिघा रेल्वे स्टेशनचे उद्घाटन नाही. कोणासाठी नेमपं थांबवलं आहे हे सगळं, असा थेट सवाल आदित्य ठाकरे यांनी प्रकल्प पूर्ण झाल्यावरही ते सुरू करण्यास टाळाटाळ करणाऱयांना केला आहे.

सुरत डायमंड बोर्सचं मात्र लगेच जगाला दाखवले. वेदांता फॉक्सकॉन, एअरबस टाटा, डायमंड बोर्ज, मेडिकल डिव्हाईस पार्क, 40 गद्दार सगळं तिथं नेलं. हा आपल्या महाराष्ट्राचा अपमान किती दिवस सहन करायचा?

2024 मध्ये तुम्ही ठरवा, आपल्या राज्याचं भविष्य आपण ठरवायचं की शेजारच्या राज्याने आणि गद्दार म्हणून ओळख असलेल्या त्यांच्या चेल्यांनी, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

आज गुड गव्हर्नन्स साजरा करताय, पण महाराष्ट्रात खरंच ‘गव्हर्नन्स’ आहे का? आदित्य ठाकरे