
विकासकामे करताना नागरी सुविधा कमीत कमी बाधित होतील याची दक्षता घ्या. जेथे खोदकाम करावयाचे आहे तेथे वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था करा. प्रकल्प बाधितांचे योग्य पुनर्वसन व्हावे, अत्यावश्यक असतील तेथेच आणि कमीत कमी झाडे तोडावीत, बाधित होणाऱ्या व्यक्तींना प्रकल्पाबाबत प्रत्यक्ष भेटून माहिती द्या, असे निर्देश पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना दिले.
मुंबई शहरात एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित कामांचा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मंत्रालयात बैठकीत आढावा घेतला. यावेळी वरळी-शिवडी, नरीमन पॉईंट-कफ परेड येथील कामांबाबत चर्चा करण्यात आली. दक्षिण मुंबईकडे येताना होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी नरीमन पॉईंट ते कफ परेड यांना जोडणारा मार्ग प्रस्तावित आहे. या मार्गाच्या प्रगतीचाही आदित्य ठाकरे यांनी आज आढावा घेतला.
या बैठकांना खासदार अरविंद सावंत, आमदार सदा सरवणकर, सचिन अहिर, नगरसेविका उर्मिला पांचाळ, एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी आदी उपस्थित होते.
दक्षिण मुंबईतील वाहतूककोंडीचा प्रश्न सुटणार
व्यावसायिक केंद्र असलेल्या दक्षिण मुंबईतील या परिसरात मोठय़ा प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे येथे वाहतूककोंडी होऊन वेळ वाया जातो. यावर उपाय म्हणून प्रस्तावित असणारा हा रस्ता नरीमन पॉईंटपासून कफ परेडकडे जाणाऱ्या प्रकाश पेठे मार्गापर्यंत उड्डाणपूल स्वरूपात असल्याने वाहतूककोंडी सुटण्यास मोठा हातभार लागणार आहे. या प्रकल्पामुळे मच्छीमारांच्या दैनंदिन जीवनात बाधा येऊ नये यादृष्टीने त्यांच्यासमवेत पुन्हा एकदा चर्चा करण्यात यावी तसेच या मार्गाच्या अंतिम मान्यतेसाठी सर्व संबंधित विभागांच्या परवानगीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश आदित्य ठाकरे यांनी दिले.
मिठी नदी स्वच्छतेचाही घेतला आढावा
मिठी नदी प्रदूषणमुक्त व्हावी यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून महानगरपालिका आणि एमएमआरडीए यांच्यामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या कामांचा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. मिठी नदीचे प्रदूषण कमी करणे, नदीत कचरा टाकला जाऊ नये यासाठी जनजागृती करणे, नागरी वस्त्यांमध्ये पुराचे पाणी जाऊ नये यासाठी आवश्यक तेथे संरक्षक भिंत बांधणे आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.




























































