
राज्यातील पर्यटन हे महत्वाचे क्षेत्र आहे. या क्षेत्रात सेवा, सुविधा पुरविणारे देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. राज्यातील पर्यटन वाढले तरच देश प्रगती करेल, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
इंडियन असोसिएशन ऑफ टूर्स ऑपरेटर्स या संस्थेच्या 38 व्या वार्षिक परिषदेत पर्यटनाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा शोध या विषयावरील चर्चासत्रात आदित्य ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. या चर्चासत्रामध्ये प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, कृषी पर्यटन विकास संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक पांडुरंग तावरे, लेमन ट्रीचे अध्यक्ष विक्रमजित सिंह हे सहभागी झाले होते. पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यातील पर्यटन हे महत्वाचे क्षेत्र आहे. महाराष्ट्रासह देशातील प्रत्येक राज्यात पर्यटन क्षेत्राला संधी आहे. या पर्यटनाच्या माध्यमातूनच त्या-त्या राज्यातील संस्कृती, धर्म, संस्कार, ऐतिहासिक वारसा यांची माहिती मिळते. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात आणि गावागावात पर्यटन क्षेत्र आहे. त्याचा विकास होणे गरजेचे आहे. देशाची लोकसंख्या वाढत चालली असून 15 ते 20 वर्षात देशाची लोकसंख्या जगात सर्वाधिक असणार आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातूनच बेरोजगार तरुण, युवकांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहे. राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळताच पर्यटन क्षेत्र वाढीच्या दृष्टीने कॅरेबिन पॉलीसी राबविण्याचा निर्णय घेतला. लायन्स मिळविण्यासाठी असलेल्या 80 अटी रद्द करून त्या 19 वर आणण्यात आल्या. 9 प्रमाणपत्र सादर करताच परवानगी देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. पर्यटन क्षेत्रात सेवा, सुविधा पुरविणारे देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. पर्यटन क्षेत्रासोबत औद्योगिक पर्यटन देखील महत्वाचे आहे. कोविडच्या दोन वर्षाच्या काळात संकटात सापडलेल्या पर्यटन क्षेत्राने पुन्हा भरारी घेतली आहे. पर्यटनाच्या माध्यमातूनच माणूसपण जपण्याची संधी मिळते. पर्यटन वाढले तरच देश प्रगती करेल, असे आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी टुरिझम असोसिएशनचे अध्यक्ष राजीव मेहरा यांनी स्वागत केले. या चर्चासत्राचे सूत्रसंचालन माधव ओझा यांनी केले.
चित्रीकरणासाठी योग्य जागा-चंद्रकांत कुलकर्णी
छत्रपती संभाजीनगर शहरासह परिसरात चित्रपट, मालिका, शॉर्ट फिल्मच्या चित्रीकरणासाठी पर्यटन स्थळे, ऐतिहासिक स्थळे, इमारती अशा योग्य जागा उपलब्ध आहेत. पाकिजा, एम. एस. धोनी, बिनधास्त, अहिंसा, बाजार, चंद सांसे या सारख्या चित्रपटासंह शॉर्ट फिल्मचे चित्रीकरण करण्यात आले आहे. महापालिकेने देखील चित्रीकरणासाठी करातून सुट देण्याचा निर्णय घेतलेला आहे. २००६ मध्ये चित्रीकरणासाठी मनपाकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचा ठराव स्थायी समिती सभापती राजू वैद्य यांनी मंजूर केला होता, याची आठवण दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी करुन दिली. या भागात शुटिंगसाठी लागणार्या तांत्रिक सुविधा, कलाकार उपलब्ध असून शुटिंगच्या सुविधा आणखी वाढवाव्यात, दरवर्षी या ठिकाणी नाट्य महोत्सव घेण्यासाठी आपले नियोजन सुरू असल्याचे चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले.
कृषी पर्यटनाला सर्वाधिक वाव- पांडुरंग तावरे
पर्यटन क्षेत्रासोबतच कृषी पर्यटनाला देखील सर्वाधिक वाव आहे. प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात कृषी पर्यटन करता येण्यासारखी स्थळे आहेत. शेतकरी देखील कृषी पर्यटन क्षेत्राकडे वळाले असून रिसोर्ट, फॉर्महाऊस, ढाबे, हॉटेल सुरू करून पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी देखील पर्यटन वाढले आहे. पर्यटनाच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. कृषी पर्यटन वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात असल्याचे व्यवस्थापकीय संचालक पांडुरंग तावरे यांनी सांगितले. लेमन ट्री चे अध्यक्ष विक्रमजित सिंह यांनी हॉटेल व्यवसायाबद्दल माहिती दिली. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, राजेंद्र राठोड, माजी महापौर नंदकुमार घोडेले यांची प्रमुख उपस्थिती होती.


























































