हिंदुस्थानी क्रिकेटपटूंना ‘शोबंदी’, बीसीसीआयच्या नोटिशीनंतर हार्दिकची माफी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना क्रीडा प्रतिनिधी । मुंबई

हिंदुस्थानी क्रिकेटपटू हार्दिक पांड्या व के. एल. राहुल यांनी करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये केलेली वादग्रस्त वक्तव्य महागात पडली आहेत. बीसीसीआयने दोघांनाही कारणे दाखवा नोटीस पाठवली असून आता भविष्यात हिंदुस्थानच्या क्रिकेटपटूंवर क्रिकेटव्यतिरिक्त शोमध्ये जाण्यास बंदी घालण्याचा विचार बीसीसीआय करीत आहे.

हार्दिक पांडय़ा आणि लोकेश राहुल या दोघांनी या शोमध्ये महिलांविषयी काही आक्षेपार्ह विधाने केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे या दोघांवर प्रचंड टीका होत आहे. या दोघांनी केलेली विधाने बीसीसीआयला चांगलीच खटकली. अशा विधानांमुळे बीसीसीआयची प्रतिमा मलीन होते. त्यामुळे या दोघांना या शोदरम्यान केलेल्या वक्तव्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याचे बीसीसीआयचे प्रशासकीय समिती प्रमुख विनोद रे यांनी सांगितले. दरम्यान, सोशल मीडियावर टीकेचा होणारा भडिमार पाहता हार्दिकने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून सर्वांची माफी मागत महिला वर्गाचा अनादर करण्याचा आपला कोणताही हेतू नसल्याचे म्हटले आहे.