विशाळगडावरील अतिक्रमण हटविणारच कोल्हापूर शिवसेनेचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी आक्रमक होऊन, कुदळ-फावडय़ांसह निघालेल्या शिवसैनिकांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, यापुढे गनिमी काव्याने जाऊन हे अतिक्रमण काढणारच, असा इशारा जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी दिला.

शाहूवाडी तालुक्यातील ऐतिहासिक विशाळगडावरील अतिक्रमणे अत्यंत वादग्रस्त झाल्याने अखेर शिवप्रेमींच्या संतापामुळे जिल्हा प्रशासनाकडून काढण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, पायथ्याकडील पार्ंकगमधीलच अतिक्रमणे काढण्यात येत असून, गडावरील अतिक्रमणे मात्र तशीच आहेत. त्यामुळे ती अतिक्रमणे त्वरित काढावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला मुदत देण्यात आली होती. त्यानंतर आज ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून, पुजलेली कुदळ- फावडे घेऊन शिवसैनिकांनी विशाळगडाकडे कूच केली.

कोल्हापूर-पन्हाळा मार्गावरील छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारक स्थळाजवळ पोलिसांकडून शिवसैनिकांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी सरकारच्या दबावामुळे विशाळगडावर जाण्यास मज्जाव केल्याची संतप्त प्रतिक्रिया शिवसैनिकांनी व्यक्त केली. तसेच, यापुढे गनिमी काव्याने विशाळगडाकडे जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव यांच्यासह शहरप्रमुख रविकिरण इंगवले, मनजित माने, दत्ताजी टिपुगडे, दिनेश साळोखे यांच्यासह शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.