बदनापुरात खासदार दानवेंचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बदनापूर

बदनापूर या तालुक्याच्या ठिकाणी जलद, अतिजलद बसेस थांबत नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. मात्र या महत्त्वाच्या प्रश्नाकडे सर्वांचे दुर्लक्ष असल्यामुळे वाहनचालकांचा मनमानी कारभार वाढला आहे. शिवशाहीसह सर्व जलद, अतिजलद बसेस थांबाव्यात व बसस्थानकाचा प्रश्न मार्गी लागावा, या मागणीसाठी क्रांतिवीर छावा संघटनेच्या वतीने जालना-संभाजीनगर महामार्ग रस्त्यावर बदनापूर येथे एक तास ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. यावेळी दोन किलोमीटरपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना देखील त्रास सहन करावा लागला. विशेष  म्हणजे जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या खासदार रावसाहेब दानवे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न आंदोलनकांनी केला.

बदनापूर शहराला तालुक्याचा दर्जा प्राप्त होऊन ३० वर्षे उलटली आहेत. दरम्यान, या तालुक्याच्या ठिकाणी परिवहन महामंडळाची जलद, अति जलद बसेस थांबत नसल्याने १९९९ मध्ये नागरिकांनी आंदोलन केल्याने परिवहन महामंडळाने बदनापूर येथे थांबा मंजूर केला. मात्र काही दिवस बसेस थांबल्या आणि पुन्हा जैसे थे स्थिती निर्माण झालेली आहे. बसेस थांबत नसल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत असून खासगी वाहनातून जालना- संभाजीनगरपर्यंत प्रवास करावा लागतो. परिवहन महामंडळाच्या बसेस  थांबाव्यात म्हणून अनेकदा निवेदने देण्यात आली. मात्र लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने प्रश्न सुटू शकलेला नाही. यासंदर्भात अनेक वेळा निवेदने देऊनही लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे  सोमवार, १८ जून रोजी क्रांतिवीर छावा संघटनेच्या वतीने प्रदेश संघटक पंकज जऱ्हाड यांच्या नेतृत्वाखाली बदनापूर येथील जालना-संभाजीनगर रस्त्यावर महाराष्ट्र बँकेसमोर एक तास ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकत्र्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तातडीने आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

यावेळी अशोक डवले, गंगाधर औताडे, पंकज जऱ्हाड, संदीप दाभाडे, सोपान कोळकर, राहुल कोल्हे, मुफीद खान, बाळासाहेब काळे, दादा जगताप, दादा ताडगे, शिवनाथ कोल्हे, स्वप्नील वाघ, अक्षय भोसले, शिवा काळे, शिवा दाभाडे, अप्पासाहेब गव्हाणे, गजानन गव्हाणे, विजय शिंदे, विजय शिरसाठ, गजानन सुरूशे, शरद खेंडके, किरण जोशी, अरुण उजेड, अजिंक्य जऱ्हाड, बाळू जऱ्हाड, विलास ठोंबरे व असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.