शेतकऱ्यांसाठी शिवसेना खासदार संजय जाधव यांचेही ठिय्या आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी

गेल्या १० दिवसांपासून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या बेमुदत उपोषणाने आज उग्ररुप धारण केले. शेतकऱ्यांना विमा मिळू नये, यासाठी कट कारस्थान करणाऱ्या कृषी-महसूल अधिकाऱ्यांसह रिलायन्स कंपनीवरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना खासदार संजय जाधव यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी बुधवार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच जिल्हाधिकारी कक्षासमोर खासदार जाधव यांच्यासह सर्वपक्षीयांनी तीन तास ठिय्या आंदोलन केले. तसेच उद्या गुरुवार, ५ जुलै रोजी उपोषणार्थी शेतकऱ्यांनी जिल्हा बंदची हाक दिली आहे.

ठिय्या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पत्रकारांशी बोलताना खासदार जाधव म्हणाले, शेतकऱ्यांवर रिलायन्स विमा कंपनीने घोर अन्याय केला आहे. जिल्ह्यातील १०७ शेतकऱ्यांनी कर्जापोटी आणि विमा न मिळाल्यामुळे आत्महत्या केल्या आहेत. यामुळे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा रिलायन्स कंपनीविरुद्ध दाखल झाला पाहिजे. या शिवाय महसूल आणेवारी व पीक आणेवारी यात खुप मोठी तफावत आहे. कृषी विभाग आणि महसुल विभागातील अधिकाऱ्यांशी संगणमत करुन रिलायंन्स कंपनीने शेतकऱ्यांना विम्याचा लाभ दिला नाही. तसेच विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या सात-बारावरील क्षेत्रफळ सुद्धा कमी केले आहे. जितक्या एकरचा विमा भरला, तितकी रक्कम नियमानुसार मिळायला हवी. परंतु रिलायंन्स कंपनीने क्षेत्रफळ कमी केल्याने त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा सुद्धा दाखल झाला पाहिजे, अशी आग्रही मागणीही खासदार संजय जाधव यांनी यावेळी केली.

माजीमंत्री सुरेश वरपुडकर, कॉ. राजन क्षीरसागर यांनीही फसव्या रिलायन्स कपंनीविरुद्ध शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे, अशी जोरदार मागणी केली. दरम्यान, जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांनी सुद्धा या ठिय्या आंदोलनानंतर शेतकऱ्यांच्या संतप्त भावना सरकारच्या निदर्शनास आणून देण्यात येतील. तसेच ज्या शेतकऱ्यांचे विमा देताना रिलायन्स कंपनीने क्षेत्रफळ कमी केले आहे, त्याची संपुर्ण चौकशी केली जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगीतले. या शिवाय गतवर्षीच्या पीकांचा उपगृहामार्फत आढावा घेऊन त्यानुसार पिकविमा देण्याबाबत संबंधीत कंपनीला बजावले जाईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

रिलायन्स पीक विमा कंपनीने मनमानी कारभार करीत जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवले. या प्रश्नावर अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १० दिवसांपासून साखळी उपोषणास प्रारंभ केला आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला सर्वपक्षीय समर्थन मिळत असून, सकाळी १० वाजता खासदार संजय जाधव हे उपोषणस्थळी दाखल झाले. यावेळी शिवसेना खासदार जाधव यांच्यासमवेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजीमंत्री सुरेश वरपूडकर, जिल्हाप्रमुख विशाल कदम, जि.प.तील गटनेते राम खराबे, माजी सभापती गणेश घाटगे, संतोष मुरकुटे, माणिक पोंढे, सदाशिव देशमुख, मधुकर निरपणे, शिवाजी कदम, महिला आघाडीच्या सखुबाई लटपटे, माणिकअप्पा घुंबरे, मोंढा व्यापारी असोसिएशनतर्फे रमेश देशमुख तसेच काँग्रेसचे जि.प.तील गटनेते श्रीनिवास जोगदंड, जि.प. सदस्य डॉ.सुभाष कदम, कॉ.राजन क्षीरसागर, विलास बाबर आदींची उपस्थिती होती.

खासदार संजय जाधव हे उपोषणास बसल्याने शहरातील विविध भागातून शिवसैनिक रॅलीद्वारे उपोषणस्थळी दाखल झाले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बुधवारी दुपारी १ ते ४ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाचे दोन्ही प्रमुख गेट बंद करण्यात आले असून, दोन्ही गेटवर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.