अहिल्यानगरवर पुन्हा पाणीटंचाईचे सावट! 167 पाणीयोजना ठप्प; टँकरवरील भार वाढला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उन्हाचा कडाका वाढत असताना अहिल्यानगर जिल्ह्यात पुन्हा एकदा पाणीटंचाईचे संकट गडद होऊ लागले आहे. भूजलपातळी झपाटय़ाने खालावत आहे. गावोगावचे तलाव, विहिरी आणि बंधारे कोरडे पडू लागल्याने जिल्ह्यातील तब्बल 167 पाणीयोजना बंद पडल्या आहेत. परिणामी अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. सध्या जिह्यात 74 टँकरच्या माध्यमातून 1 लाख 13 हजार 225 नागरिकांना पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने यंदा टंचाईची तीव्रता कमी राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच अनेक पाणी स्रोत आटू लागल्याने परिस्थिती गंभीर बनत आहे. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा पूर्णपणे विहिरी, बोअरवेल आणि लहान जलस्रोतांवर अवलंबून असल्याने त्यांचा जलसाठा संपताच पाणीयोजना बंद पडू लागल्या आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण 1389 स्वतंत्र ग्रामीण पाणीयोजना कार्यरत आहेत. त्यापैकी आतापर्यंत 167 योजना बंद पडल्या असून, पुढील काही आठवडय़ांत हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे टँकरच्या मागणीतही मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात योजना हाती घेण्यात आल्या होत्या. मात्र, निधीअभावी या योजनांची गती मंदावल्याने अनेक कामे अर्धवट अवस्थेत पडून आहेत. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून 830 पाणीयोजनांची कामे सुरू करण्यात आली होती. त्यातून 927 गावांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, त्यापैकी केवळ 274 योजना पूर्ण झाल्या असून, तब्बल 430 योजना निधीअभावी रखडल्या आहेत.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडूनही 112 प्रादेशिक पाणीयोजना हाती घेण्यात आल्या होत्या; परंतु पाच वर्षांच्या कालावधीत केवळ तीनच योजना पूर्ण झाल्या आहेत. कोटय़वधी रुपयांचा निधी खर्च होऊनही ग्रामीण भागातील नागरिकांना अद्याप टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

पाणी योजना बंद पडण्याचे सर्वाधिक प्रमाण पाथर्डी तालुक्यात असून, तेथे 107 पैकी 36 योजना ठप्प झाल्या आहेत. त्याखालोखाल पारनेरमध्ये 31, जामखेडमध्ये 23, कर्जतमध्ये 14, अहिल्यानगर तालुक्यात 12, शेवगावमध्ये 11, राहुरीमध्ये 9, संगमनेरमध्ये 8 आणि अकोले तालुक्यात 5 योजना बंद पडल्या आहेत. विशेष म्हणजे कोपरगाव, राहाता, श्रीगोंदे आणि श्रीरामपूर तालुक्यांमध्ये अद्याप एकही योजना बंद पडलेली नाही. सध्या जिल्ह्यातील 74 गावे आणि 358 वाडय़ावस्त्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. वाढत्या उष्णतेमुळे आणखी पाणीयोजना बंद पडल्यास टँकरची संख्या वाढवावी लागणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.