नगर जिल्ह्यासाठी नवे 34 महसूल मंडळ कार्यालये मंजूर, 202 तलाठी सजांची भर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य शासनाने नगर जिह्यासाठी नवे 202 तलाठी सजे आणि 34 महसूल मंडळ कार्यालये मंजूर केली आहेत. त्यामुळे तलाठी सजांची संख्या आता 788, तर मंडळ कार्यालयांची संख्या 131 झाली. कार्यालयांची संख्या वाढल्यामुळे तलाठी संवर्ग पदांच्या संख्येत 202, तर महसूल मंडलाधिकारी संवर्गाच्या 34 पदांची नव्याने भर पडली आहे. त्यामुळे 51 तलाठय़ांना मंडलाधिकारीपदी पदोन्नती दिली आहे.

तलाठी संवर्गाची पदे थेट सरळ सेवा भरतीने भरावयाची आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने जमाबंदी विभागाकडे प्रस्ताव दाखल केला आहे. जिह्यात तलाठी सजा आणि मंडळ कार्यालयांची संख्या वाढल्यामुळे महसुली कामकाजाला वेग येणार आहे. राज्य शासनाने 2017-18मध्ये तलाठी सजांची पुनर्रचना केली. त्यानुसार राज्यात तीन हजार 165 नवीन सजे निर्माण करण्यात आले.

सहा तलाठी सजांमागे एक महसूल मंडळ यानुसार नवीन 528 महसूल मंडळे निर्माण करण्यात आले. नगर जिह्यासाठी किती तलाठी सजा आणि महसूल मंडळ कार्यालयांची आवश्यकता आहे, याचा प्रस्ताव नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाने जिल्हा प्रशासनाकडे मागविला होता. त्यानुसार राज्य शासनाने जिह्यासाठी वाढीव 202 तलाठी सजा आणि 34 महसूल मंडळ कार्यालये मंजूर केले आहेत. नगर तालुक्यात 15 सजे आणि एक महसूल मंडळ, अकोले तालुक्यात 21 सजे व चार मंडल कार्यालयांची वाढ झाली. तालुकानिहाय कमीत कमी सहा व जास्तीत जास्त 23 सजांची, तर कमीत कमी एक, तर जास्तीत जास्त चार महसूल मंडळांची वाढली आहे. तलाठी व महसूल मंडळ कार्यालयांची संख्या वाढल्याने तलाठी व मंडलाधिकारी यांच्याकडील कामांचा बोजा कमी होणार आहे.

तलाठी पदांची एकूण संख्या (कंसात वाढ)

– अकोले 69 (21), संगमनेर 83 (22), कोपरगाव 38 (7), राहाता 37 (8), श्रीरामपूर 31 (6), राहुरी 50 (8), नगर 72 (15), नेवासा 63 (15), पाथर्डी 56 (17), शेवगाव 47 (9), श्रीगोंदा 68 (20), पारनेर 73 (23), कर्जत 59 (23), जामखेड 39 (8).

मंडलाधिकारी एकूण संख्या (कंसात वाढ)

– अकोले 12 (4), संगमनेर 14 (4), कोपरगाव 6 (1), राहाता 6 (1), श्रीरामपूर 5 (1), राहुरी 8 (1), नगर 12 (1), नेवासा 11 (3), पाथर्डी 9 (3), शेवगाव 8(2), श्रीगोंदा 11 (3), पारनेर 12 (4), कर्जत 10 (4), जामखेड 7 (2).

14 महिला तलाठी झाल्या मंडलाधिकारी

– प्रशासनाची निवड, कर्मचाऱयांची सोय आणि नागरी सेवा मंडळाकडील शिफारशी विचारात घेऊन तलाठी संवर्गातील 51 कर्मचाऱयांना महसूल मंडलाधिकारीपदी पदोन्नती दिली आहे. यामध्ये 14 महिलांचा समावेश आहे.