
राज्यभरात अवकाळी पावसाने तर दुसरीकडे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्याचे 135 कोटी रुपयांचे अनुदान नगर जिल्ह्याला प्राप्त झाले असून ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या व अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी राज्य सरकारकडून प्राप्त झालेल्या अनुदानाचे वाटप जिल्ह्यात सुरू केले आहे. मंगळवारी (26 नोव्हेंबर) दुपारपर्यंतच्या आकडेवारीनुसार अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीपोटी 67 कोटी 40 लाख 48 हजार रुपयांचे वाटप झाले होते.
परतीच्या व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. जिल्ह्यातील 1 हजार 583 गावांतील शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला. बाजरी, मका, कपाशी, कांदा, मूग आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. फळबागांनादेखील पावसाचा फटका बसला. या नुकसानीपोटी राज्य सरकारने मदत जाहीर केली असून यामध्ये नगर जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात 135 कोटी 55 लाख 9 हजार रुपयांचे अनुदान मिळाले आहे. या अनुदानाचे वाटप जिल्हा प्रशासनाने सुरू केले आहे.
जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त आकडेवारीनुसार जिल्ह्यातील चौदा तालुक्यांमध्ये मिळून मंगळवारी दुपारपर्यंत 67 कोटी 40 लाख 48 हजार रुपयांच्या अनुदानाचे वाटप झाले होते. तर, पहिल्या टप्प्यामध्ये प्राप्त झालेल्या अनुदानापैकी उर्वरीत 68 कोटी 14 लाख 61 हजार रुपयांचे अनुदानाचे वाटप करण्याचे काम हे दोन दिवसांमध्ये पूर्ण होण्याचा अंदाज आहे. अनुदानाचे वाटप केल्यानंतर लाभार्थी यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार ही यादी प्रसिद्ध करण्याची तयारी सुरू आहे. दरम्यान, जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा 4 लाख 54 हजार 12 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला असून अंदाजे 475 कोटींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे उर्वरीत अनुदानाची रक्कम केव्हा भेटणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.






























































