
शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर महापालिकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यासाठी महापालिकेने दक्षता पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यामध्ये प्रभाग समिती एकसाठी पथकप्रमुख म्हणून परिमल निकम यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना सहायक कर्मचारी राहुल साबळे, संतोष बिज्जा मदत करणार आहेत. प्रभाग समिती दोनसाठी पथकप्रमुख म्हणून शशिकांत नजान, सहायक कर्मचारी सूर्यभान देवघडे, भारस्कर आकुबत्तीन यांची नियुक्ती आहे.
प्रभाग समिती तीनसाठी पथकप्रमुख संतोष लांडगे, सहायक कर्मचारी विजय बोधे, अमोल लहारे, तर प्रभाग चारसाठी पथकप्रमुख उपअभियंता कल्याण बल्लाळ यांची नेमणूक केली असून, त्यांना सहायक कर्मचारी के. पी. जाधव, नंदकुमार नेमाणे मदत करणार आहेत.
सार्वजनिक ठिकाणी आणि कामाच्या ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य आहे. सदर दक्षता पथकामार्फत विनामास्क फिरणाऱया नागरिकांवर शासन निर्देशानुसार रुपये 200 दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच हॉटेल, मंगल कार्यालये, जिम, चौका-चौकातील गर्दीच्या ठिकाणी, बाजार समिती, भाजीबाजार, व्यापारीपेठा तसेच दुकानात ग्राहकांमध्ये कमीत कमी 6 फूट अंतर ठेवण्यात यावे, तसेच आस्थापना कामाच्या ठिकाणी सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
महापालिकेची पथके विविध ठिकाणी जाऊन पाहणी करणार आहेत. ज्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन करण्यात येणार आहे, तेथे दंड ठोठावण्यात येणार आहे, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
वर्षभरात 412 जणांचा कोरोनाने मृत्यू
– गेल्या काही दिवसांत कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. नगर शहरातही कोरोनाबाधित आढळण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. नगर शहरात वर्षभरात कोरोनाने 412 जणांचा बळी घेतला आहे. आता सुरू असलेल्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने नटराज हॉटेल व जैन-पितळे हॉस्टेल अशा दोन ठिकाणी कोरोना सेंटर सुरू केले आहे. सेमवारी गुलमोहोर रोडवरील कोहिनूर मंगल कार्यालयासमोर असलेली जयश्री कॉलनी, सिव्हिल हडके भागातील गणेश चौक व बालिकाश्रम रस्त्यावरील आयर्न अपार्टमेंटमधील दोन इमारती मायक्रो कंटेन्मेंट झोन घोषित केल्या आहेत.



























































