
न्यायालयातील खटला मागे घेण्यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांचे बंधू राजेश जाधव यांच्यासह संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देणाऱया तिघांवर तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्याचाही समावेश आहे.
मदन पुरोहित, अजित पुरोहित व मनसे पदाधिकारी परेश पुरोहित अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी राजेश तुकाराम जाधव (वय 54, रा. सातभाईमळा, दिल्लीगेट, नगर) यांनी फिर्याद दिली आहे.
जाधव आणि पुरोहित कुटुंबीयांमध्ये जुना वाद आहे. यातून यापूर्वीही परस्परविरोधी गुन्हे दाखल आहेत. रविवारी सकाळी 10 वाजता राजेश जाधव हे त्यांचे भाऊ सतीश जाधव यांना औषधे देण्यासाठी साताळकर हॉस्पिटल येथे गेले असता, मदन पुरोहित याने जाधव यांना ‘कोर्टात चालू असलेली केस मागे घे,’ असे म्हणत धक्काबुक्की आणि मारहाण केली. त्यानंतर राजेश हे भाऊ सतीश जाधव यांच्या घरात गेले. त्यानंतर मदन पुरोहित, अजित मदन पुरोहित व परेश पुरोहित हे सत्तूर व तलवार घेऊन त्यांच्या घरात गेले.
तेथे शिवीगाळ करून ‘तुम्ही आमच्याविरुद्ध कोर्टात चालू असलेली विनयभंगाची कसे मागे घ्या; नाहीतर तुझे संपूर्ण खानदान खल्लास करून टाकू,’ अशी धमकी दिली. तसेच परेश पुरोहित यानेही राजेश जाधव यांना मारून टाकण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी मदन पुरोहित, अजित पुरोहित, परेश पुरोहित यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.




























































