नगरकरांच्या स्वप्नपूर्तीकडे वाटचाल उड्डाणपुलाच्या 75 पिलरचे काम पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील उड्डाणपुलाच्या प्रत्यक्ष कामास डिसेंबर महिन्यात सुरुवात झाली. उड्डाणपुलाच्या एकूण 85 पिलरपैकी 75 पिलरचे काम पूर्ण झाले आहे. दोन महिन्यांच्या लॉकडाऊनमध्ये वाहतूक बंद होती. त्यामुळे उड्डाणपुलाच्या कामास चांगली गती मिळाली. उर्वरित दहा पिलर उभारण्याचे काम बाकी असून, त्यानंतर पिलरवर गर्डर टाकण्यात येऊन सक्कर चौक व चांदणी चौकात रॅम्प उभारण्यात येणार आहेत.

सक्कर चौक ते स्टेट बँक चौकदरम्यान सुमारे तीन कि.मी. अंतराच्या उड्डाणपुलाचे काम करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत हे काम केले जात असून, यासाठी सुमारे 375 कोटी रुपये केंद्र सरकारने मंजूर केले आहेत. उड्डाणपुलाच्या युटिलिटी कामासाठी राज्य सरकारने 52 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. यातील 17 कोटी  50 लाखांचा पहिला हप्ता मनपाला यापूर्वीच प्राप्त झालेला आहे. सक्कर चौक व चांदणी चौक या दोन ठिकाणी रॅम्प करण्यात येणार आहेत. उड्डाणपुलाचे काम गुजरातच्या अग्रवाल या बांधकाम संस्थेला देण्यात आलेले आहे.

यापूर्वी भूसंपादन रखडल्याने उड्डाणपुलाचे काम लांबणीवर पडले होते. मात्र, आता सक्कर चौकातील काही खासगी जागेचे भूसंपादन वगळता सर्व भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागल्याने उड्डाणपुलाच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात होऊन काम प्रगतिपथावर आहे. सध्या पिलरचे काम करण्यात येत असून, 75 पिलर उभे राहिले आहेत. सक्कर चौकातील काही खासगी जागेचे भूसंपादन राहिल्याने येथे पिलर उभारण्याचे काम थांबले आहे. या जागांच्या अधिग्रहणासाठी मनपाकडे पैसे नसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, पाइपलाइन स्थलांतरणाची कामे मनपामार्फत होणे अपेक्षित होते.  सक्कर चौक ते कोठी दरम्यान पाइपलाइनचे काम पूर्ण झाले आहे.

वाहतूक मार्गात बदल

स्टेशन रस्त्यावर उड्डाणपुलाच्या कामासाठी या रस्त्यावर वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. ही वाहतूक कोठीमार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे अवजड वाहतूक सक्कर चौक ते कोठी या रस्त्यावरून सुरू झाली आहे. वाहतूक वळविल्यामुळे उड्डाणपुलाच्या कामात येणारा अडथळा दूर झाला आहे.