
पावसाळा तोंडावर आला असतानाही धोकादायक इमारतींवरील कारवाईकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. शहरात धोकादायक म्हणून घोषित केलेल्या 7 व नोटिसा बजावण्यात आलेल्या 120 पैकी एकाही इमारतीवर कारवाई झालेली नाही. नोटिसा बजावूनही काही मालमत्ताधारकांनी स्ट्रक्चरल ऑडिट केलेले नाही.
शहराच्या मध्यवर्ती परिसरात अनेक जुने वाडे व इमारती आहेत. त्यातील अनेक इमारतींची दुरवस्था झालेली आहे. काही जुने वाडे मोडकळीस आलेले आहेत, तर अनेक बांधकामे 40 ते 50 वर्षांपूर्वीची आहेत. पावसाळ्यामध्ये अशा जुन्या इमारती खचण्याची अथवा पडण्याची अधिक भीती असते. महापालिकेने शहरातील अशा इमारतींचे सर्वेक्षण करून 120 इमारतमालकांना नोटिसा बजावलेल्या आहेत. संबंधितांनी स्ट्रक्चरल ऑडिट करून ते महापालिकेत सादर करणे अपेक्षित आहे. मात्र, एकाही मालमत्ताधारकाकडून महापालिकेत स्ट्रक्चरल ऑडिट सादर झालेले नाही.
तसेच, महापालिकेने यापूर्वी 12 इमारती धोकादायक असल्याचे व त्या तत्काळ उतरवण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यापैकी 7 इमारतींवर कारवाई झालेली नाही. पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळून जीवित अथवा वित्तहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी इमारती रिकाम्या करणे आवश्यक आहे.


























































