
जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे रेमडेसिविरसोबतच ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवू लागला आहे. जिह्यात आता अवघा एक दिवस पुरेल एवढाच ऑक्सिजनचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी एमआयडीसीतील कंपन्यांना नोटीस पाठवून सर्व ऑक्सिजन ताब्यात घेतला आहे. दरम्यान, जिह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे शनिवारी नगर जिह्याच्या दौऱयावर असून, ते काय निर्णय घेतात, याकडे जिह्याचे लक्ष लागले आहे.
नगर जिह्यामध्ये गेल्या 15 दिवसांत रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. रुग्णांचा रोजचा आकडा तीन हजारांच्या पार जात आहे. रुग्ण वाढत असल्यामुळे जिल्हा रुग्णालयासह खासगी दवाखाने पूर्ण क्षमतेने भरले आहेत. चार दिवसांपूर्वी खासगी दवाखान्यांमध्ये 80 टक्के जागा आरक्षित ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याची अंमलबजावणी कमी-अधिक प्रमाणामध्ये सध्या पाहायला मिळत आहे.
नगर जिह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार उजेडात आला होता. श्रीरामपूर, कोतवाली व भिंगार हद्दीमध्ये तीन ठिकाणी कारवाया करण्यात आल्या होत्या. दरम्यान, भिंगार येथील ज्या रुग्णालयात ही घटना घडली तेथील रुग्णांचे हाल होत आहेत. त्यांना इतरत्र हलविण्यात येणार आहे.
रेमडेसिविरसोबतच जिह्यात ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडचा तुटवडा निर्माण झाला आहे. जिह्यात अवघा एक दिवस पुरेल एवढाच ऑक्सिजनचा साठा शिल्लक असल्यामुळे प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. कालच जिल्हाधिकारी भोसले यांनी आरोग्य संघटनेच्या पदाधिकाऱयांसोबत बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा केली होती.
जिह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ उद्या नगर जिह्याच्या दौऱयावर येत आहेत. कोपरगाव, शिर्डी येथे ते कोविड सेंटरला भेट देणार आहेत. त्याचबरोबरीने जिल्हा प्रशासन समवेत दुपारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होणार आहे.
रेमडेसिविरचा काळाबाजार; श्रीरामपुरातील मेडिकल कर्मचारी अटकेत
शहरातील कर्मवीर चौकातील एका मेडिकल कर्मचाऱयाने रेमडेसिविर औषधाचा काळाबाजार केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दिनेश बनसोडे असे पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. यापूर्वी पोलिसांनी कोल्हार येथील शुभम श्रीराम जाधव, बार्शी तालुक्यातील भातंब्री येथील प्रवीण प्रदीप खुने या दोघांना रेमडेसिविर इंजेक्शन 20 हजार रुपये किमतीस विकत असताना पकडले होते.
ऑक्सिजनसाठी जिल्हा शल्यचिकित्सकांचे जिल्हाधिकाऱयांना पत्र
नगर जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सध्या ऑक्सिजनची कमतरता भासू लागली असून, याबाबत तातडीने उपाययोजना व्हाव्यात, अशी मागणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी जिल्हाधिकाऱयांकडे पत्राद्वारे केली आहे. जिल्हा रुग्णालयातील आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक गुरुवारी (दि.15) दुपारी झाली. त्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना पत्र दिले आहे.




























































