नगरकरांनी घरात राहणेच केले पसंत; जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून पाहणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारपासून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. नगर शहरात याची कडक अंमलबजावणी करण्यात आली. पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील रस्त्यावर उतरले होते. त्यांनीही अनेक वाहनांची तपासणी केली. त्यानंतर प्रत्येक चौकाचौकामध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. दरम्यान, पोलिसांच्या तपासणीमुळे आणि सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत नगरकर नागरिकांनी घरातच राहणे पसंत  केले. त्यामुळे रस्त्यावर तुरळक वाहतूक होती.

पोलीस उपविभागीय अधिकारी अजित पाटील, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्यासह अधिकारी  उपस्थित होते.

आज सकाळी नागरिक रस्त्यावर दिसत होते. काहीजण रुग्णालयांमध्ये, तर काहीजण औषध घेण्यासाठी बाहेर पडले होते. जे लोक लोक रस्त्यावर आले होते, त्यांची पोलिसांकडून तपासणी तसेच विचारणा केली जात होती.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी रस्त्यावर उतरून संचारबंदीची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते याचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी नागरिकांची चौकशी केली. विनाकारण फिरणाऱयांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शहरातील डीएसपी चौक तसेच पत्रकार चौक दिल्ली गेट व कापड बाजार या महत्त्वाच्या ठिकाणी वर्दळ होती. मात्र, पोलिसांनी तपासणी सुरू केल्यानंतर ही वर्दळ कमी झाली. या संचारबंदीला शहरातील व्यापाऱयांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यांनी दुकाने बंद ठेवली. शहरातील सर्जेपुरा, दाळमंडई, कापड बाजार, दवा बाजार, नवी पेठ, मंगळवार बाजार या भागांत शुकशुकाट होता.

…. तर कडक कारवाई करणार – जिल्हाधिकारी

n शहरामध्ये सुरू असलेल्या कारवाईची आज पाहणी केली. यावेळी काही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे आढळून आले. कोणीही घराबाहेर पडू नये व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी केले. तरीही नागरिक बाहेर पडले तर कडक कारवाई करावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.