‘नगर अर्बन’च्या शेवगाव शाखा व्यवस्थापकाची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 नगर अर्बन बँकेतील अनेक घोटाळे उघड होत असतानाच बँकेच्या शेवगाव शाखेचे व्यवस्थापक गोरक्षनाथ सूर्यभान शिंदे (वय 58, रा. भातकुडगाव, ता. शेवगाव) यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीला आली आहे. दरम्यान, त्यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत बँकेतील सोने तारण घोटाळ्याला गोल्ड व्हॅल्युअर आणि संबंधित कर्जदारच जबाबदार असल्याचा उल्लेख केला आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे बनावट सोने तारण घोटाळा आता चांगलाच गाजणार आहे.

नगर अर्बन बँक शेवगाव शाखेचे व्यवस्थापक गोरक्षनाथ शिंदे हे 31 मे 2021 रोजी सेवानिवृत्त झाले होते. मात्र, बँक प्रशासनाने त्यांचा सेवाकाळ तीन महिन्यांसाठी वाढवून दिला होता. आज सकाळपासून गोरक्षनाथ शिंदे घरातून बाहेर पडले होते. सकाळपासून ते घरी न आल्यामुळे त्यांच्या घरच्यांनी शोध घेतला असता दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी शेतामध्ये विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शेवगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता. त्यानंतर त्यांचा मृतदेह नगर येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.

गोल्ड व्हॅल्युअरच घोटाळ्याला जबाबदार

मयत शिंदे यांच्या खिशात आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी आढळून आली असून, त्यात ‘मी माझ्या आयुष्यात चोरी, लबाडी केलेली नाही. माझी फक्त फसवणूक झाली आहे. बँकेत नेमलेल्या गोल्ड व्हॅल्युअरवर विश्वास ठेवून सोने तारण व्यवहार होतात. त्यांनी परीक्षण, मूल्यांकन केल्यानंतर दिल्या जाणाऱया दाखल्यावर विश्वास ठेवून कर्जदारांना सोने तारण कर्ज मंजूर केले जाते. खातेदाराच्या समक्ष पिशवीत सोने तारण केलेले दागिने ठेवले जातात. गोल्ड व्हॅल्युअर, खातेदार व शाखाधिकाऱयाच्या समक्ष सीलबंद केल्यानंतर खातेदार व गोल्ड व्हॅल्युअरची सही घेऊन ती पिशवी शाखाधिकाऱयाच्या ताब्यात दिली जाते. या सर्व व्यवहाराला गोल्ड व्हॅल्युअर जबाबदार असतो,’ असे त्यांनी म्हटले आहे.