‘एआय’ परवानगीमुळे गृहनिर्माण, पुनर्विकास प्रकल्पांना गती मिळणार पालिकेकडून CivitTwin ऑप्लिकेशन सुरू; सुविधा जलद, अचूक, पारदर्शक आणि कार्यक्षम होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईमध्ये आता इमारत बांधकामाची परवानगी ‘एआय’च्या माध्यमातून दिली जाणार आहे. यासाठी पालिकेने ‘डिजिटल अप्रूव्हल ट्विन’ संकल्पनेनुसार आधारित CivitTwin हे ऑप्लिकेशन सुरू केले आहे. यामुळे इमारत बांधकाम परवानगी आता जलद, अचूक, पारदर्शक आणि कार्यक्षम होणार असल्याची माहिती पालिका आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिली. यामुळे मुंबईतील गृहनिर्माण, पुनर्विकास प्रकल्प वेगाने मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

अशा प्रकारे CivitTwin ऑप्लिकेशन सुरू करणारी मुंबई ही देशातील पहिलीच महापालिका ठरली आहे. या डिजिटल ऑप्लिकेशननुसार इमारत / बांधकाम प्रस्तावांची प्रत्यक्ष सादरीकरणापूर्वीच ‘आभासी पूर्व-तपासणी’ (Virtual Pre-Scrutiny) केली जाणार आहे. त्यामुळे वास्तुविशारद, विकासक आणि संबंधित व्यावसायिकांना प्रस्तावातील त्रुटी, अपूर्ण कागदपत्रे, नियमभंग किंवा आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्रे यांची माहिती सुरुवातीलाच मिळणार आहे. परिणामी मंजुरी प्रक्रियेत होणारा विलंब मोठय़ा प्रमाणावर कमी होणार आहे.

 असा होणार फायदा

सध्या बांधकाम / इमारत प्रस्ताव सादर केल्यानंतर अनेकदा ते आक्षेपांसह परत पाठवले जातात. अपूर्ण अर्ज, गहाळ कागदपत्रे, विकास नियंत्रण नियमांचे उल्लंघन किंवा आवश्यक परवानग्यांचा अभाव यामुळे प्रस्तावांमध्ये वारंवार दुरुस्त्या कराव्या लागतात. या प्रक्रियेमध्ये अनेक आठवडे, तर काही वेळा महिन्यांचाही विलंब होत असतो. मात्र आता CivitTwin ही प्रणाली या समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.