
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट सही आणि बनावट शिक्काप्रकरणी दोषी आढळणाऱयांवर कठोर कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सांगितले. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यासंदर्भात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे सभागृहात हा विषय उपस्थित करत सखोल चौकशीची मागणी केली होती. सह्या बनावट करता मग मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीदेखील डुप्लिकेट आणा अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. मुख्यमंत्री कार्यालयात यापूर्वीसुद्धा विशेष कार्यकारी अधिकारी सहा महिने तोतया म्हणून कार्यरत होता आणि त्याने अनेक अधिकाऱयांच्या बदल्यासुद्धा केल्या होत्या. तो स्वतः फाईल घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जायचा आणि स्वाक्षरी घेऊन यायचा. तो खरा आहे की खोटा विशेष कार्यकारी अधिकारी आहे हे मुख्यमंत्र्यांनाही माहीत नव्हते ही अतिशय दुर्दैवी आणि चिंतेची बाब आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारवाईचे आश्वासन दिले.

























































