
राष्ट्रवादी काँगेसचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी शुक्रवारी सायंकाळी आपल्या आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने पक्षात तर भूकंप झालाच, पण राजकारणातही खळबळ उडाली. राजीनामा दिल्यानंतर अजितदादा थेट ‘सायलेंट मोड’वर गेल्याने उलटसुलट चर्चेला ऊत आला. अखेर रात्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच पुण्यातील पत्रकार परिषदेत राजीनाम्याचा खुलासा केला आणि पार्थ पवारशी झालेल्या संवादाचा हवाला देत अजितदादांच्या राजकीय संन्यासाचे संकेत दिले.
पुण्याकडे येत असताना माझ्या कानावर बातमी आली की पक्षाचे विधिमंडळ नेते @AjitPawarSpeaks यांनी त्यांच्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयाची मला यत्किंचितही कल्पना नव्हती. कुटुंबप्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे की त्यांच्या राजीनाम्याचे कारण जाणून घ्यायचे. pic.twitter.com/t8Wd2frU8J
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 27, 2019
मुंबईतील ‘ईडी’ कार्यालयात जाण्याचा निर्णय रद्द केल्यानंतर पवार तडक पुण्याच्या दिशेने निघाले होते. त्याच दरम्यान, अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे रात्री पवार पत्रकारांशी बोलताना ईडी आणि अजितदादांचा राजीनामा हे विषय येणारच हे अपेक्षित होते. पवारांनीही अजितदादांच्या राजीनाम्याचा विषय टाळला नाही.
त्यांनी अध्यक्षांना हा राजीनामा मंजूर करावा अशी विनंती केल्याचे समजते. त्याप्रमाणे त्यांनी तो मंजूर केला. राजीनामा देण्याआधी किंवा दिल्याच्या नंतर त्यांनी संपर्क साधलेला नाही. मी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण माझा काही त्यांच्या संपर्क होऊ शकलेला नाही.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 27, 2019
त्यांचा स्वभाव हाती घेतलेलं काम धडाडीने पूर्ण करण्याचा व एखादी गोष्ट पटली नाही तर त्यासंबंधी रोखठोक भूमिका घेण्याचा आहे. माझं नाव आल्याने त्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. एक्स्ट्रीम निर्णयामागे हे कारण असावं. कुटुंबप्रमुख म्हणून मी जबाबदारीने जरूर यात लक्ष घालणार आहे.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 27, 2019
अजितदादांनी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या स्वीय सहाय्यकाकडे दिला आणि फोनवरूनच अध्यक्षांना राजीनामा मंजूर करण्याची विनंती केली. अध्यक्षांनीही राजीनामा तातडीने मंजूर केल्यानंतर अजितदादा मोबाईल बंद ठेवून ‘सायलेंट मोड’वर गेले. त्यांच्याशी कुणाचाच संपर्क झाला नाही. त्यांच्या राजीनाम्याचे वृत्त बाहेर येताच राष्ट्रवादीत एकच खळबळ उडाली. कारण या राजीनाम्याबाबत पक्षातील कुठल्याच नेत्याला काहीही ठाऊक नव्हते. त्यामुळे नंतर मात्र प्रसारमाध्यमांमध्ये राजीनाम्याची कारणे शोधली जाऊ लागली. ईडीच्या चौकशीपासून पवार कुटुंबातील कलहापर्यंत कारणे दिली जाऊ लागली.
पवारांना काहीही कल्पना नाही
पुणे दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनीच रात्री मग याचा खुलासा केला. ते म्हणाले, राजीनामा देण्यापूर्वी अजित यांनी माझ्याशी चर्चा केली नव्हती. राजीनामा का दिला याची मला यत्किंचितही माहिती नाही. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण तो होत नाही. त्यामुळे जेव्हा त्यांच्याशी बोलणे होईल तेव्हाच राजीनाम्याचे नेमके कारण समजेल, असे पवार म्हणाले.
गृहकलह अजिबात नाही
पवार कुटुंबातील वादामुळेच अजितदादांनी राजीनामा दिल्याच्या चर्चेला शरद पवार यांनी खोडसाळ ठरविले. ते म्हणाले, पवार कुटुंबात अजिबात कलह नाही. आजही कुटुंबप्रमुखाचे ऐकण्याचे धोरण आमच्याकडे आहे. दरवर्षी दिवाळीत तीन-चार दिवस आमचे सगळे कुटुंब एकत्र असते. त्यामुळे गृहकलहाचा विषयच चुकीचा असल्याचे पवार म्हणाले. राजीनामा देण्यापूर्वी आणि नंतरही अजितदादांशी आपला काहीही संपर्क झालेला नाही. त्यामुळे राजीनाम्याचे कारण मलाही नेमके सांगता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
अजितदादांचे ठरले होते?
आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच घेतला होता असे संकेत विधानसभाध्यक्षांनी दिले आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी मला फोन केला होता आणि तुम्ही कुठे आहात एवढेच विचारले होते असे हरिभाऊ बागडे म्हणाले. आजही त्यांनी राजीनामा दिल्यावर त्यांना विचारले की, तुम्ही राजीनामा का देता? निवडणूक लढणार नाही का? तेव्हा मी आता काही बोलणार नाही. माझा राजीनामा मंजूर करा, असे त्यांनी सांगितल्याचे बागडे म्हणाले.
माझ्यावरील आरोपांमुळेच ‘तो’ अस्वस्थ
अजितदादांच्या कुटुंबाशी पवारांचे बोलणे झाले. त्या बोलण्याचा हवाला देत पवार म्हणाले, माझ्यावरील आरोपांमुळे ‘तो’ अस्वस्थ होता असे त्याने मुलाला (पार्थ) सांगितले होते. काकांनी 52 वर्षे राजकारणात काम केले. चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषविले. अशा माणसाच्या मागे बँकेच्या कारभारामुळे चौकशीचे शुक्लकाष्ठ लागले हे सहन होत नाही, असेही अजितदादांनी पार्थला सांगितले. राजकारणाची पातळी घसरली आहे. आपण आता राजकारण सोडूया आणि शेती किंवा उद्योग करूया असा ‘वडिलां’चा सल्लाही त्यांनी पार्थला दिल्याचे पवार म्हणाले.
ईव्हीएम किंवा अन्य इतर विषयांकर त्यांच्यात आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाहीत. विचार करणाऱ्या माणसांची दोन वेगळी मते असू शकतात. एकदा भेट झाल्यानंतर मी त्यांच्याशी चर्चा करेन. कुटुंबप्रमुख म्हणून त्यांनी आजपर्यंत माझ्या शब्दाला नकार दिलेला नाही. पक्षप्रमुख आणि कुटुंबप्रमुख म्हणून मी त्यांना समजावून सांगेन.
आपल्या काकांवर म्हणजे माझ्यावर ‘ईडी’ने नाहक गुन्हा दाखल केल्यामुळे अजित पवार अस्वस्थ होते. त्यांना हे सहन झाले नाही म्हणूनच त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांकडून कळले.’
– शरद पवार
राष्ट्रवादीला झटका
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांनी राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीला जोरदार झटका बसला आहे. या राजीनाम्याची कोणतीही पूर्वकल्पना शरद पवारांसह कोणत्याच नेत्याला नव्हती. त्यामुळे सर्वच हैराण आहेत. तशात पार्थशी झालेल्या चर्चेचा हवाला देऊन शरद पवार यांनी अजितदादांच्या राजकीय संन्यासाचे संकेत दिल्याने राष्ट्रवादी पक्षच चक्रावून गेला आहे. दरम्यान, अजित पवार मुंबईतच असून त्यांच्या भेटीसाठी शरद पवार रात्रीच मुंबईच्या दिशने रवाना झाले.
तलवार म्यान नाही, युद्ध जिंकणारच!
अजितदादांसारख्या आक्रमक नेत्याने आमदारकीचा राजीनामा दिला आणि कोणतेही कारण न देता ते नॉट रिचेबल झाले. याचा अर्थ राष्ट्रवादीने निवडणुकीत आपली तलवार म्यान केली असा काढायचा का, असा सवाल पत्रकारांनी केला असता पवार ताडकन म्हणाले, बिलकूल नाही. तलवार म्यान करण्याचा प्रश्नच नाही. आता फक्त युद्ध जिंकायचे आहे आणि ते आम्ही जिंकणारच. विधानसभेची काळजी तुम्ही करू नका. आम्ही राज्याचे चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही.


























































