
माझ्याकडे सध्या अर्थ खाते आहे म्हणून झुकतं माप मिळतं, पण अर्थ खाते पुढे टिकेल की नाही सांगता येत नाही, असे विधान उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱयातील अनुपस्थितीनंतर अजितदादांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय चर्चांनी जोर धरला आहे.
बारामती येथील एका कार्यक्रमात सहकारी संस्था आणि कारखान्यांबद्दल बोलताना अजित पवार यांनी हे विधान केले. आपल्या संस्था ताकदवान आणि आर्थिक सक्षम झाल्या पाहिजेत. माझे अर्थ खाते टिकेल की नाही माहीत नाही, पण खरेदी-विक्री संघ, दूध संघ, बारामती बँक, माळेगाव, सोमेश्वर आणि छत्रपती कारखाना हे पण ताकदीचे झाले पाहिजेत. तिथे चुका होत असतील तर दुरुस्त केल्या पाहिजेत, असे अजित पवार म्हणाले.
अजित पवारांना डावललं जातंय -एकनाथ खडसे
अजित पवार यांच्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अजित पवार यांना डावललं जात असल्याची भावना त्यांच्या मनात दिसत आहे. म्हणून त्यांनी अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली, असे खडसे म्हणाले.
अजितदादा सावध असल्याचे मला समाधान – जयंत पाटील
अजित पवार यांच्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “अजित पवार सावध असल्याचे मला समाधान आहे. अजित पवार स्वखुशीने सरकारमध्ये सामील झाले आहेत. अन्याय होत असल्यास ते विचार करतील,’’ असे जयंत पाटील म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारमध्ये बारामतीला भरपूर मिळाले
अजित पवार यांनी यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमधील आठवणही सांगितली. महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना अनेक फाईल्स माझ्याकडे यायच्या. त्यात कोणत्या गावांची नावे आहेत ते पाहायचे आणि बारामतीचे नसेल तर ते टाकून सही करायचो, असे ते म्हणाले.
भविष्यात काय होईल माहीत नाही – बावनकुळे
अजित पवार यांच्या विधानाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजितदादांचे ते विधान राजकीय नाही तर नैसर्गिक विधान आहे, असे म्हटले. भविष्यात काय होईल, हे कुणालाच माहीत नसते. उद्या काय होईल किंवा तुमचा-माझा उद्याचा दिवस कसा असेल हे कुणालाच माहीत नसते, असे सूचक विधानही बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.


























































