
जिल्हयातील पाच सार्वत्रिक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे चित्र सोमवारी सायंकाळी स्पष्ट झाले. सरपंच व सदस्य पदाच्या 31 जागांसाठी 58 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या ग्रामपंचायतीचे मतदान येत्या 8 डिसेंबर रोजी आहे. वेगवेगळ्या राजकिय पक्षातील कार्यकर्त्यांनी प्रचार करण्यास सुरुवात केली आहे.
महाड तालुक्यातील मुमुर्शी, भोमजई व पिंपळकोंड तर कर्जत तालुक्यातील तिवरे व वरईतर्फे निड या पाच ग्रामपंचायतींच्या पाच सरपंच व 39 सदस्य पदासाठी एकूण 122 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यात 19 सरपंच व 103 सदस्य पदासाठी अर्जांचा समावेश होता. छाननीत सर्व अर्ज वैध ठरविण्यात आले. माघार प्रक्रीयेत सरपंच पदाच्या 10 उमेदवारांनी माघार घेतली. तर एका सरपंच पदाची निवड बिनविरोध निवड झाली. एकूण चार सरपंच पदासाठी आठ उमेदवार रिंगणात आहेत. तसेच सदस्य पदाच्या 41 उमेदवारांनी माघार घेतली असून 12 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे 27 जागांसाठी 50 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण सरपंच व सदस्य पदाच्या 31 जागांसाठी 58 उमेदवार रिंगणात आहेत.
राज्यातील सत्तेत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडी सत्तेवर बसल्यानंतर पहिलीच जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका लागल्या आहेत. त्यामुळे या महा विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये हा फॉर्म्युला लागू पडला आहे का हे चित्र 9 डिसेंबरला स्पष्ट होणार आहे.

































































