
सामना प्रतिनिधी। अलिबाग
जिल्ह्यात पर्यटनाला चालना मिळण्यासाठी शासन प्रयत्नशील असून काशीद समुद्रकिनारी सागरमाला प्रकल्पाअंतर्गत रो रो जेट्टी तसेच इतर सुविधांसाठी 112 कोटी 45 लाख रुपये खर्चाचा प्रस्तावाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे मुरुड काशीद कडे येणाऱ्या पर्यटकांना मुंबईहून थेट काशीद समुद्र किनाऱ्यावर येण्यास मिळणार आहे.
या रो रो प्रकल्पामुळे काशीद तसेच मुरुडच्या परिसराला आर्थिक चालना मिळणार आहे. या प्रकल्पातंर्गत काशिद येथे रो-रो जेट्टी, ब्रेक वॉटर बंधारा, पार्किंग, टर्मिनल इमारत, जोडरस्ता तसेच विद्युत व पाण्याची सोय करणे ही कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
रायगड हा पर्यटन जिल्हा म्हणून प्रसिद्ध असून पर्यटकांची पहिली पसंती ही काशीद समुद्र किनारा आहे. मुंबईवरून रस्ते, तसेच मांडवा वरून अलिबागला बोटीने व तेथून रस्ते मार्गे काशीद समुद्र किनारी पर्यटक येत असतात. त्यामुळे या प्रवासात खूप वेळ जात होता. तसेच खराब रस्ते, वाहतूक कोंडी याचा त्रास पर्यटकांना सध्या सहन करावा लागत आहे. मात्र असे असूनही काशीद समुद्र किनारा हा पर्यटकांनी नेहमी बहरलेला असतो.
काशीद समुद्र किनारी होणाऱ्या रो रो जेट्टी प्रकल्पामुळे पर्यटकांना वाहतूक कोंडी तसेच खड्डेमय रस्त्याचा सामना करावा लागणार नाही. मुंबई येथून जलमार्गे आनंद लुटत पर्यटक आपल्या वाहनासह काशीद समुद्र किनारी येणार आहेत. त्यामुळे पर्यटकांचा वेळही वाचण्यास मदत मिळणार आहे. सागरमाला प्रकल्पा अंतर्गत रो रो जेट्टी व इतर सुविधा होणार असल्याने काशीदच्या परिसरात पर्यटनाला चालना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे स्थानिकांच्या रोजगारात वृद्धी होण्यास मदत मिळणार आहे.
सध्या काशिद समुद्रकिनारी पर्यटकांना अनेक सोयी-सुविधांचा अभाव भेडसावत आहे. यामध्ये पार्किंग व्यवस्थेसह, टर्मिनल व्यवस्था, सार्वजनिक प्रसाधन गृह, सार्वजनिक पाण्याची व्यवस्था, जोड रस्ता यांचा समावेश आहे. यामुळे या प्रकल्पात पर्यटकांना भेडसावणार्या समस्या सोडविण्याकडेही लक्ष देण्यात आले आहे. या प्रकल्पात रो-रो जेट्टी, ब्रेक वॉटर बंधारा, पार्किंग, टर्मिनल इमारत, जोडरस्ता तसेच विद्युत व पाण्याची सोय करण्याची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
त्यानुसार 112 कोटी 45 लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव मंजूरीसाठी राज्य सरकारकडे महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने सादर केला होता. या प्रस्तावाला राज्य सरकारने परवानगी दिली असल्याने, लवकरच उर्वरित प्रक्रीया पार करुन काशिद येथे रो-रो सेवा सुरु होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. केंद्र सरकारकडून 50 टक्के निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने तयार केलेल्या 112 कोटी 45 लाख खर्चाच्या प्रस्तावाला मान्यता देण्याबरोबरच काही बाबींची पूर्तता करण्याच्या सूचना मेरिटाईम बोर्डाला केल्या आहेत. त्यानुसार राज्य सरकारने केंद्र सरकारकडून आवश्यक त्या मान्यता प्राप्त करण्याच्या अटीवर सागरमाला कार्यक्रमातंर्गत प्रस्तावाला मान्यता दिली आहे. तसेच हा प्रस्ताव राज्य सागरमाला समितीच्या मान्यतेने केंद्र सरकारच्या हिश्शातील 50 टक्के निधी मिळण्याकरीता प्रयत्न करण्याकरीता केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली आहे. तसेच केंद्र सरकारकडून निधी प्राप्त न झाल्यास वाढीव निधी हा महाराष्ट्र मरीटाईम बोर्डाच्या स्वनिधीतून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच सदर कामांसाठी पर्यावरण तसेच इतर विभागांच्या आवश्यक परवानग्या घेण्यात याव्या अशी अट राज्य सरकारने प्रस्तावाला मान्यता देताना घातल्या आहेत.
मंजूर प्रकल्पात करण्यात येणारी कामे
प्रवासी व रो-रो जेट्टी – 3 कोटी 45 लाख 43 हजार 448
पार्किंग – 6 कोटी 81 लाख 30 हजार 133
जोड रस्ता – 7 कोटी 3 लाख 63 हजार 225
टर्मिनल इमारत – 1 कोटी 8 लाख 61 हजार 976
































































