
सामना प्रतिनिधी । धाराशिव
जन माणसातील पोलीस दलाविषयी असणारी प्रतिमा बदलण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. नुकतेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात अमुलाग्र बदल करीत सर्वच पोलीस ठाण्याला आएसओ मानांकन मिळविले आहे. आता एक पाऊस पुढे टाकत जिल्ह्यात कोणत्याही पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर फिर्यांदींना त्यांना लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची एक आकर्षक फाईल देण्यात येणार आहे.
पोलीस विभागात लोकाभिमुख प्रशासन राबविण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले जात आहेत. सर्वसामान्य जनतेत कायद्याविषयी असणारे अपुर्ण ज्ञान तसेच पोलीस कामकाजाबाबत असणारे गैरसमज दुर करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या जात आहेत. कम्युनिटी पोलीसींग, मोहल्ला कमिटी, महिला दक्षता समिती, तक्रार निवारण दिन असे विविध उपक्रम सध्या पोलीस प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत आहेत. जिल्हा पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या संकल्पनेतून असाच एक अभिनव उपक्रम सध्या राबविण्यात येत आहे. यामध्ये फिर्यादीने तक्रार दिल्यानंतर त्याला त्याच्या तक्रारीसंदर्भातील सर्व कागदपत्रे एका आकर्षक अशा फाईलमध्ये देण्याची व्यवस्था यामध्ये करण्यात आलेली आहे.
पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर त्या तक्रारीचा दिनांक, पोलीस ठाणे, गुन्हा रजिस्टर नंबर, प्रकरणात लागू करण्यात आलेले कलम, तपास अंमलदार या सर्व बाबींची कागदपत्रे फिर्यादीला विनामुल्य दिली जाणार आहेत. तसेच प्रथम खबरी अहवालाची प्रत देखील फिर्यादीस तात्काळ व विना मूल्य देण्याची व्यवस्था या उपक्रमात करण्यात आली आहे. अपघातासंदर्भातील गुन्ह्यात प्रथम खबरी अहवाल, घटनास्थळी पंचनामा संबंधीत वाहन व वाहन चालकांविषयीचे कागदपत्र, जखमीचे वैद्यकीय प्रमाणपत्र व इतर संबंधीत कागदपत्रांच्या नकला विना मुल्य साक्षांकित करुन ही संपूर्ण फाईल फिर्यादीला देण्यात येईल. ही सर्व कागदपत्रे पोलीस दलाने तयार केलेल्या एका आकर्षक फाईलमध्ये फिर्यादीला देण्याची व्यवस्था केली आहे.
या फाईलवर जनतेला लागणारी सर्व माहिती दिलेली आहे. यामध्ये तपास अधिकाऱ्याचा संपर्क क्रमांकसुध्दा असणार आहे. तसेच या फाईलवर वाहतुक नियमाचे पालन करण्याचा शिवाय वाहने हळू चालवून अपघात टाळण्याचा संदेश देण्यात आला आहे. हेल्मेट वापरा – जीव वाचवा, दारु पिऊन वाहने चालवू नका, वाहन चालविताना मोबाईलवर बोलू नका, बेटी बचाव – बेटी पढ़ाओ, चाईल्ड हेल्प लाईन-१०९८, जेष्ठ नागरिक हेल्प लाईन-१०९०, उमन हेल्प लाईन-१०९१, रुग्ण सेविका-१०८ याचे संदेश व नंबर दिलेले आहेत. याशिवाय या फाईलमध्ये नागरिकांनी घ्यावयाच्या विशेष काळजीची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यासाठी अपर जिल्हा पोलीस अधीक्षक स्वाती भोर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदिप घुगे, धाराशिवचे उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड, कळंबचे नितीन कटेकर, भूमचे सिध्देश्वर धुमाळ, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक दगडूभाई शेख तसेच सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांचे सहकार्य लाभत आहे.































































