
सामना प्रतिनिधी । बीड
कायदा सर्वसामान्यांसाठी कठोरतेने वापरायचा अन् प्रभावशाली लोकांपुढं झुकायचं. हा प्रकार बीडमध्ये होत आहे. ज्या आरोपींवर गुन्हा दाखल आहे आणि ज्यांचा जामीनही झाला नाही, असे अनेक आरोपी मोठ्या अधिकाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. यामुळे कायद्याची लक्तरे वेशीला टांगली जात असून डिसीसी बुडवणाऱ्या या लोकांना खुद्द सरकारचाच अभय असल्याचे स्पष्ट होत आहे. सामान्य नागरिकांना हे खपत नाही. प्रशासन हे का खपवून घेतय माहित नाही. या लोकांना पोलीस आता तरी अटक करतील का ? असा प्रश्न जन आंदोलनाचे विश्वस्त अॅड.अजित एम.देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
वडवणी खरेदी विक्री संघ, वडवणीने काही वर्षापूर्वी जनावरांची चारा छावणी चालवण्यासाठी बोगस कर्ज डि.सी.सी.बँक बीडकडून कर्ज घेतले होते. या चारा छावणीचे मंजुरीपत्रच बोगस असल्याची तक्रार आहे. या संघाने संगनमताने चारा छावणी न चालविता डिसीसीचे कर्ज घेतले आहे. या आणि अन्य काही कारणांमुळे खरेदी विक्री संघाच्या संचालकांसह डिसीसीच्या संचालकांवर वडवणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. यात या गुन्हेगारांनी जामीन घेतला आहे.
दरम्यान उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काम करणाऱ्या एस.आय. टी.ने तपास करून लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यातील कलम १३ (१) आणि १३ (२) ही दोन कलमे वाढविली आहेत. या कलमांमुळे हे प्रकरण वडवणी तालुका न्यायालयातून स्तर न्यायालय, माजलगाव येथे वर्ग झाले आहे. या प्रकरणात काही आरोपींनी जामीन घेतला आहे. मात्र गेल्या दिड वर्षांपासून काही आरोपी विना जामीन फिरत आहेत. विशेष म्हणजे या सर्व बाबी सर्व संबंधितांना माहित असतानाही ते यांना अभय देत आहेत. यातून या आरोपींचे मनोबल वाढले असून हे आरोपी शासकीय समारंभ असो की सामाजिक, वरिष्ठ लोक प्रतिनिधी असोत की वरिष्ठ अधिकारी, विवाह समारंभ असो की एखादे उद्घाटन या सर्व कार्यक्रमात ते बिनधास्त वावरताना दिसतात.
माजलगाव कोर्टात दि.९ जुलै २०१७ सर्व आरोपी हजर असताना हा सर्व प्रकार उघडकीस आला आणि आरोपींमध्ये खळबळ माजली. या प्रकरणात आरोपींना विना सायास जामीन मिळेलही. पण जामीन नसताना हे लोक मोकाट फिरतात. हे दुर्देव कायद्याचं आहे की त्यांच्या रखावलदारांचे याचं उत्तर आता कोणी तरी द्यायला हवं. दरम्यान यातील काही आरोपींनी दाखल करण्यासाठी मुदत मागीतल्याचेही समजले आहे. या प्रकरणातील आरोपींमध्ये राजाभाऊ मुंडे, मंगल मोरे, सुभाष सारडा, आनंद चव्हाण, धैर्यशील सोळंके, सुदाम बडे, रामकृष्ण कांदे, मनोहर डाके, रमेश पोकळे, लता सानप, रामराव आघाव, मधुकर ढाकणे, गणपत बनसोडे, शोभा जगदीश काळे यांसह इतरांचा समावेश असल्याची माहिती आहे.
यातील एखादे दुसरे नाव कमी जास्त असू शकते. यातील कोणी जामीन घेतला आणि कोणी घेतला नाही, ही बाब पोलिसांनीच तपासली पाहिजे. मात्र जामीन नसताना यातील ९ आरोपी आपल्या प्रभावाचा वापर करीत फिरत आहेत. डिसीसी बँक बुडविणाऱ्यांवर कारवाई झाली. मात्र यातलं सातत्य राहील नाही. ठेवीदारांना आजही ठेवींचे पैसे मिळत नाहीत. त्यामुळे शुभ कल्याण मल्टीस्टेट व डी.एस.कुलकर्णी वर आज ज्या पद्धतीने ठेवीदारांच्या ठेवी परत मिळत नाहीत म्हणून कारवाई होते, त्याच पद्धतीने डिसीसीच्या ठेवीदारांनी या लोकांवर गुन्हे नोंद करायला हवेत. जामीन न होता फिरणाऱ्या या आरोपींवर आता पोलीस काय कारवाई करतात, की सभा आणि समारंभात त्यांच्या बरोबर राहतात, हे जनता पाहील, असे अॅड.देशमुख यांनी म्हटले आहे.































































