
शिवसेनेचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली. विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी हे रोज ठाण्यात येऊन पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेत आहेत. पण पालकमंत्री एकनाथ शिंदे हे पूर्णेकरांच्या कुटुंबीयांना का भेटले नाहीत? त्यांच्या मनात पाप असल्यामुळेच ते आले नाहीत, अशा शब्दांत शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे यांनी सुनावले.
शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी आज पूर्णेकर कुटुंबीयांच्या घरी जाऊन त्यांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना दानवे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर कडाडून टीका केली. ते म्हणाले, ठाण्याचे मसिहा स्वतःला म्हणणारे कुणाला साधे खरचटले तरी दवाखान्यात धाव घेतात आणि व्हिडीओ सोशल मीडियावर टाकतात. ते स्वतःला धर्मवीर आनंद दिघे यांचे पाईक समजतात. प्रदीप पूर्णेकरसारख्या निष्ठावान कडवट शिवसैनिकाची हत्या होऊनही शिंदे यांना त्यांच्या घरी जाऊन कुटुंबाची भेट घ्यावी असे का वाटले नाही, असा थेट सवाल दानवे यांनी केला. या वेळी शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचारे, आमदार सुनील शिंदे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, शहरप्रमुख अनिष गाढवे आदी उपस्थित होते.
मास्टरमाइंडला तत्काळ अटक करा
पूर्णेकर यांच्या हत्येचे प्लॅनिंग करणाऱया मास्टरमाइंडला पोलिसांनी तत्काळ अटक करावी, अशी मागणी शेकापचे नेते व माजी आमदार जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. त्यांनी आज पूर्णेकर यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली तसेच त्यांचे सांत्वनही केले. शेकाप पक्ष या लढय़ात तुमच्यासोबत असल्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली.




























































