
नांदेड, छत्रपती संभाजीनगर व नागपूर शहरातील शासकीय रुग्णालयात गेल्या काही दिवसात अनेक रुग्ण दगावले आहेत. औषधांची कमतरता व डॉक्टरांची कमी यामुळे हे मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. त्यावरून राज्य सरकारच्या आरोग्य विभागाचे धिंधवडे निघाले.
दरम्यान हाफकीन संस्थेला 2022-23 साली 108 कोटी रुपयांचं औषध खरेदीचं कंत्राट दिलं होतं. मात्र सरकारने त्यातील फक्त 50 कोटी रुपयेच हाफीकनला दिले असून पूर्ण पैसे मिळाल्याशिवाय कोणत्याही कंपनीचे औषध खरेदी करणार नसल्याची भूमिका हाफकीनने घेतल्याची समोर आले आहे. त्यावरून विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
”हाफकीन संस्थेला 2022-23 मध्ये 108 कोटी रुपयांच औषध खरेदीच कंत्राट दिलं. मात्र त्यातील ५० कोटीच रुपये हाफकीन ला देण्यात आले आहेत. पूर्ण पैसे मिळाळ्याशिवाय कोणतीही कंपनीचे औषध खरेदी करणार नाही अशी भूमिका हाफकीन संस्थेने घेतल्याची माहिती हाफकीनच्या अधिकारी वर्गासोबत घेतलेल्या बैठकीत मिळाली. सरकार जनतेच्या आरोग्याच्या जीवाशी खेळतेय. दीडशे कोटी रुपये जाहिरातीसाठी खर्च केले जातात. सरकारने आपल्या ‘शासन आपल्या दारी’ या योजनेचे नाव बदलून ‘मृत्यू आपल्या दारी’ करावे” अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.



























































