नवाब मलिकांप्रमाणेच प्रफुल्ल पटेलांबाबत तीव्र भावना आहेत का? अंबादास दानवेंचा फडणवीसांना पत्राद्वारे सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी गुरुवारी हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावली आणि ते थेट सत्ताधारी बाकावर बसले. आजही ते सत्ताधारी बाकांवर बसले. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहून भूमिका स्पष्ट केली. याच मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.

नवाब मलिक यांच्याबाबत जशा तीव्र भावना आहेत तशाच दाऊद व त्याच्या हस्तकांशी संबंध असलेल्या प्रफुल्ल पटेल यांच्याबाबतही आहेत का, अशी विचारणा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली.

विधानसभा सदस्य नवाब मलिक यांच्याबाबत आपण व्यक्त केलेल्या तीव्र भावना वाचून आनंद झाला. नवाब मलिक यांचे देशद्रोह्यांशी संबंध असल्याने त्यांना अजित पवार यांच्या सत्ताधारी बाकावर बसण्यास आपण विरोध केला. आपण नैतिकता व राष्ट्रवाद याबाबत किती पक्के आहात हेच यातून दिसले. पण अजित पवार गटाचे राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल हे अलीकडेच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना भेटल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे.

गोंदिया विमानतळावर मधल्या काळात पटेलांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. याच पटेल यांचे दाऊद व त्याच्या हस्तकांशी संबंध आहेत व दाऊदच्या खास हस्तकाकडून पटेल यांनी आर्थिक व्यवहार केल्याने ईडीने पटेल यांची संपत्ती जप्त केली आहे. नवाब मलिक यांच्याबाबत आपल्या ज्या तीव्र भावना आहेत, तसाच भावना प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत आहेत काय? याचा खुलासा आपल्याकडून होणे गरजेचे आहे. तरी याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी आशा बाळगतो, असा मजकुर दानवे यांच्या पत्रात आहे.

खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या मालमत्तेवर ईडीने जप्तीची कारवाई केली होती. ती देखील दाऊदच्या खास हस्तकाशी निगडित असलेल्या प्रकरणात! जशी ‘तीव्र’ भावना आपण नवाब मालिकांबद्दल व्यक्त केली, तीच भावना आपली खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याबाबतही आहे का? याचा खुलासा व्हायला हवा! कारण त्यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गोंदिया विमानतळावर स्वागतही केले होते, असे ट्विट अंबादास दानवे यांनी केले. सोबत त्यांनी मोदी आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीचे फोटोही पुरावे म्हणून शेअर केले आहेत.