
सामना प्रतिनिधी । अंबरनाथ
अवैध डंपिंग ग्राऊंड बद करा आणि अंबरनाथ वाचवा, असा नारा देत शहरवासीयांनी थेट डंपिंग ग्राऊंडवर धडक देत निदर्शने केली. शेकडो नागरिकांनी एकत्र येत डंपिंग ग्राऊंडच्या विरोधात निदर्शने केली. यापुढे या डंपिंगवर एकही गाडी येऊ देऊ देणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
अंबरनाथ फॉरेस्ट नाका येथील डंपिंग ग्राऊंडवर लागणाऱया आगीमुळे दुर्गंध आणि धुराचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. या डंपिंगविरोधात ग्रीन सिटी, हरी ओम पार्क आणि मोरीवली पार्क भागातील रहिवासी एकवटले असून त्यांनी डंपिंगविरोधात संघर्ष समिती तयार केली आहे. या समितीच्या माध्यमातून डंपिंगविरोधात आज निदर्शने केली. डंपिंगचे आरक्षण ज्या जागेवर आहे त्या शहराच्या बाहेर कचरा हलवण्यात यावा, आताचे डंपिंग ग्राऊंड बंद करावे अशी आंदोलकांची मागणी आहे. मोरीवली पाडय़ातूनच हे आंदोलनकर्ते डंपिंग ग्राऊंडपर्यंत पोहोचले. दरम्यान आंदोलनाची दखल घेऊन पालिकेने कचरा टाकण्याचे काम थांबवले जाईल, असे आश्वासन देत या ठिकाणी मातीचा भराव टाकण्याचे काम सुरू केले.






















































