
देशाच्या वायुदलातून निवृत्त झालेल्या एअर मार्शल, एअर चीफ मार्शलची आता चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) म्हणून नियुक्ती करता येणार आहे. त्यासाठी संरक्षण मंत्रालयाने एअरफोर्सच्या नियमावलीत (1964) मध्ये दुरुस्ती केली आहे. मात्र संबंधिताचे वय 62 वर्षांपेक्षा जास्त असून नये अशी अट ठेवली आहे.
जनरल बीपीन रावत यांच्या अपघाती निधनानंतर सीडीएस पद रिक्त आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सीडीएसची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे संरक्षण मंत्रालयाने एअरफोर्सच्या नियमावलीत सुधारणा केली असून ती आता एअरफोर्स नियमावली (2022) या नावाने ओळखली जाणार आहे. या सुधारणेमुळे आता निवृत्त एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांचे नाव सीडीएसच्या स्पर्धेत आले आहे. बी. एस. धनोआ यांनी 25 वे वायुदलप्रमुख म्हणून काम पाहिले आहे.
जनरल नरवणे यांच्या नावाचीही चर्चा
सीडीएस पदासाठी जनरल मनोज नरवणे यांच्या नावाचीही चर्चा आहे. नरवणे यांची कारकीर्द उत्कृष्ट असून त्यांनी चीनची घुसखोरी सक्षमपणे रोखत त्यांना माघार घेण्यास भाग पाडले होते. नरवणे यांच्या नावाबरोबरच एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी, नौदलाचे चीफ ऑडमिरल आर. हरीकुमार, एअर मार्शल बी. आर. कृष्णा यांची नावेही स्पर्धेत आहेत.




























































