
अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाचे ज्यो बायडन आणि रिपब्लीकन पक्षाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळत आहे. सध्या तरी बायडन यांनी आघाडी घेतल्याचे चित्र असले तरी ट्रम्प यांनी सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे जागतिक महासत्तेच्या प्रमुखपदासाठीचा सामना आता सुप्रीम कोर्टात लढला जाण्याची शक्यता आहे.
अमेरिकेच्या इतिहासात गेल्या शंभर वर्षातील सर्वात चुरशीची ही राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक असल्याचे म्हटले जाते. मंगळवारी मतमोजणीला सुरूवात झाली आणि सर्व राज्यात अतितटीची लढत पाहायला मिळाली. ओहियो, नॉर्थ पॅरिलोना, पेन्सिल्वेनिया या राज्यांमध्ये बायडन यांनी निर्णायक आघाडी घेतली. टेक्सासमध्ये अतितटीचा सामना पाहायला मिळाला. येथे बायडन यांना 49.99 टक्के तर ट्रम्प यांना 48.70 टक्के मते मिळाली. फ्लोरिडा आणि मिशिगनमध्ये ट्रम्प यांना निर्णायक मते मिळाली. जॉर्जिया, उत्तर पॅरिलोना या राज्यांचा कौल महत्त्वाचा आहे. बायडन यांनी आघाडी घेतल्यास ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ होईल. न्यूयॉर्कमध्ये बायडन यांनी आघाडी घेतली आहे.
विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी मतमोजणीत घोटाळा केला गेल्याचा आरोप करीत पेन्सिल्वनिया येथील मतमोजणी थांबविण्याची मागणी केली. मीच विजयी होणार आहे पण आता ही लढाई सुप्रीम कोर्टात होईल. त्यामुळे मतमोजणी थांबवावी असे ट्रम्प यांनी मंगळवारी मध्यरात्री दोन वाजता व्हाईट हाऊसबाहेर जमलेल्या आपल्या समर्थकांशी बोलताना सांगितले. दरम्यान, बायडन यांनीही डेमोक्रेटिक पक्ष सुप्रीम कोर्टात लढण्यास तयार आहे. आमच्याकडे वकिलांची टीम आहे, असे आव्हान दिले. सर्वच मतांची मोजणी होईपर्यंत माझी थांबण्याची तयारी आहे. शेवटी मीच राष्ट्राध्यक्ष होणार असा विश्वास बायडन यांनी व्यक्त केला.
10 कोटी पोस्टल, ई-मेल मतदान ठरणार निर्णायक
कोरोनामुळे 10 कोटी अमेरिकन नागरिकांनी घरातूनच पोस्टल आणि ई-मेलद्वारे मतदान केले आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात घरातून मतदान होण्याची पहिलीच वेळ आहे. अद्यापी या मतपत्रिकांची मोजणी झालेली नाही. हे मतदान निर्णायक ठरणार आहे.
इलेक्टोरल कॉलेज मतेच महत्त्वपूर्ण
- अमेरिकेत इलेक्टोरल कॉलेज हेच राष्ट्राध्यक्षांची निवड करतात. जनतेने ज्या पक्षाला सर्वाधिक मते (पॉप्युलर व्होट) दिली म्हणजे त्या पक्षाचा राष्ट्राध्यक्ष होतोच असे नाही.
- अमेरिकेत जनता आपल्या राज्याच्या प्रतिनिधीसाठी मतदान करते. थेट राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवाराला नाही.
- राज्याच्या लोकसंख्येनुसार इलेक्टोरल कॉलेज मते निश्चित असतात. अमेरिकेत इलेक्टोरल कॉलेजची संख्या 538 आहे. उमेदवाराला 270 इलेक्टोरल कॉलेज मिळतात तोच राष्ट्राध्यक्ष होतो.
- 2016 च्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्या पक्षाला सर्वाधिक 48.2 टक्के पॉप्युलर मते मिळाली तर ट्रम्प यांना 46 टक्के मते मिळाली होती. मात्र, इलेक्टोरल कॉलेज मतदान झाले तेव्हा ट्रम्प यांना 306 आणि हिलरी यांना 231 मते मिळाली. त्यामुळे ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाले.
हिंदुस्थानी वंशाचे चार उमेदवार विजयी
अमेरिकेच्या निवडणुकीत हिंदुस्थानी वंशाच्या चार उमेदवारांनी विजय मिळविला आहे. अमेरिकेच्या कनिष्ठ सभागृहात (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह) डॉ. एमी बेरा, राधा कृष्णमुर्ती, प्रमिला जयपाल आणि रो खन्ना हे दुसऱयांदा विजयी झाले. हे चारही उमेदवार डेमोक्रेटिक पक्षाचे आहेत. हिंदुस्थानी वंशाच्या प्रतिनिधींच्या गटाला कृष्णमुर्ती हे ‘समोसा कॉक्स’ असे म्हणतात. या चारजणांव्यतीरिक्त डॉ. हिरल तिपिरनेनी यांनीही निर्णायक आघाडी घेतली आहे. दरम्यान, उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार कमला हॅरिस आहेत. हॅरीस या डेमोक्रेटिक पक्षाच्या सिनेटर आहेत.
कोणाच्या बाजूने किती इलेक्टोरल कॉलेज मते
- ‘फॉक्स न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार ज्यो बायडन यांना 237 तर ट्रम्प यांना 210 आतापर्यंत इलेक्टोरल कॉलेज मिळाल्याचे म्हटले आहे.
- सीएनएन’ने बायडन यांना 215 तर ट्रम्प यांना 171 इलेक्टोरल कॉलेज मते.
- न्यूयॉर्क टाईम्सच्या अंदाजानुसार बायडन यांना 213 तर ट्रम्प यांना 174 इलेक्टोरल कॉलेज मते आहेत.
- 538 इलेक्टोरल कॉलेज मते असतात. यात 270 जो मते घेईल तो राष्ट्राध्यक्ष होतो. आतापर्यंत बायडन यांची आघाडी आहे.






























































