अंदरसुल गावातला रस्ता 5 महिन्यांत उखडला, रस्त्यासाठीचा 60 लाख रुपये निधी गेला वाया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी, येवला

अंदरसुल गावातील गेल्या पाच महिन्यांपूर्वी काँक्रीटचा रस्ता करण्यात आला होता. मात्र हा रस्ता उखडल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. किंबहुना येथून ये-जा करणेही धोक्याचे झाले आहे. त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर नव्याने बनवावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन देण्यात आले आहे.

अंदरसुल गावातील उंदीरवाडी चौफुली ते बाजारतळ हा गावातील मुख्य रस्ता पालकमंत्री गिरीष महाजन व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी अर्थसंकल्पीय तरतुदीतून तरतूद करून या रस्त्यासाठी 60 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला होता. या रस्त्याचे काम चालू असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष दिले नाही, तसेच संबंधित ठेकेदाराने हा रस्ता बनवताना मातीमिश्रित वाळू व सिमेंटचा कमी वापर करून हा रस्ता बनवल्याने या रस्त्यावर 5 महिन्यांच्या आत खड्डे पडलेले आहेत.

हा रस्ता निकृष्ट दर्जाचे काम करून केला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्यात येऊन संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आले आहे. यावेळी आनंद शिंदे, संतोष केंद्रे, ओबीसी आघाडीचे अध्यक्ष संजय भोसले, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष बाबासाहेब पवार, समीर शेख, किशोर शिंदे, समीर सय्यद, रवी मोरे, देविदास आहेर, मारुती पवार, सुनंदाताई दिवाने, कांताबाई भालेराव आदी उपस्थित होते.